
११ थरांसाठी २१ लाख रुपयांचे बक्षीस
ठाणे : शहरातील प्रतिष्ठीत रेमंड रहिवाशी संकुलात सलग दुसऱ्या वर्षी भव्य दहीहंडीचा थरार रंगणार आहे. युवा स्टार प्रतिष्ठान'चे अध्यक्ष तुकाराम आंब्रे यांनी उत्सवाचे आयोजन केले असून, ११ थरांसाठी २१ लाख रुपयांचे, तर १० थरांसाठी ५ लाख रुपयांचे बक्षीस दिले जाणार आहे. सात थर रचणाऱ्या महिला गोविंदा पथकाला १ लाख रुपये देऊन गौरविण्यात येईल. युवा स्टार प्रतिष्ठान’चे अध्यक्ष तुकाराम आंब्रे यांनी आज ही माहिती दिली. युवा स्टार प्रतिष्ठान'बरोबरच टेन एक्स हॅबिटंट, आशियाना निवासी संकुल आणि खेड तालुका रहिवाशी संघातर्फे उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. रेमंड रहिवाशी संकुलात मराठी नागरिकांबरोबरच परराज्यातील नागरिकांची संख्या मोठी आहे. या भागातील नागरिकांसाठी सामाजिक, सांस्कृतिक, क्रीडा, धार्मिक आदी विविध उपक्रमयुवा स्टार प्रतिष्ठान’तर्फे राबविण्यात येत आहेत. महाराष्ट्राच्या संस्कृतीची नागरिकांना ओळख करून देण्याबरोबरच परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची वर्तक नगर येथील विक्रमी दहीहंडी व युवा नेते पूर्वेश सरनाईक यांनी प्रो-गोविंदा संकल्पना राबवून गोविंदांना आंतरराष्ट्रीय स्तरावर स्थान मिळवून दिल्याचा आदर्श ठेवून रेमंड संकुलात सलग दुसऱ्या वर्षी दहीहंडी उत्सव भरविण्यात येत आहे, अशी माहिती आयोजक तुकाराम आंब्रे यांनी दिली. त्यात लाखो रुपयांची बक्षीसे आहेत. गेल्या वर्षी उत्सवाला १०० हून अधिक पथकांनी सहभाग घेतला होता. पहिल्या वर्षाच्या यशानंतर यंदा उत्सवाची जय्यत तयारी करण्यात आली आहे.
या उत्सवात जन्माष्टमीच्या सोहळ्यावेळी रेमंड संकुलातील बच्चे कंपनीकडून हंडी फोडली जाईल. तसेच लहान मुलांसाठी फॅन्सी ड्रेस स्पर्धा होणार असून, स्थानिक ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार केला जाणार आहे.
भव्य दहीहंडी उत्सवात पहिल्यांदा ११ थर रचणाऱ्या पथकाला २१ लाख रुपयांचे बक्षीस व चषक दिला जाईल. तर सर्वप्रथम १० थर रचणाऱ्या पथकाला ५ लाख रुपयांचे बक्षीस व चषक दिला जाईल. सर्वप्रथम नऊ थर रचणाऱ्या पथकाला २ लाख रुपये दिले जातील. त्यानंतर ९ थर लावणाऱ्या गोविंदांना १ लाख रुपये बक्षीस दिले जाईल. ८ थर रचणाऱ्या गोविंदा पथकाला २५ हजार रुपये, सात थरांसाठी १० हजार रुपये, सहा थरांसाठी ५ हजार, ५ थरांसाठी ३ हजार रुपये आणि स्मृतीचिन्ह दिले जाईल. यंदा रेमंड दहीहंडीत एकही गोविंदा जखमी होऊ नये, यासाठी सुरक्षा टीम सज्ज राहील. त्याचबरोबर दुर्घटनेच्यावेळी तत्काळ उपचारासाठी वैद्यकीय यंत्रणा सज्ज राहणार आहे.
या उत्सवाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, खासदार नरेश म्हस्के, आमदार रवींद्र फाटक, आमदार संजय केळकर, आमदार निरंजन डावखरे, युवासेनेचे कार्याध्यक्ष पुर्वेश सरनाईक यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहून गोविंदा पथकांना प्रोत्साहन देणार आहेत.
या उत्सवाच्या यशस्विततेसाठी अध्यक्ष तुकाराम आंब्रे यांच्याबरोबरच मंडळाचे खजिनदार परशुराम आंब्रे, राहुल सादरे, राजेंद्र कुंभार, मुकुंद डोके,
संकेत कदम, विशाल खर्से, श्रीकांत भागवत, शैलेश अहिरराव, निबेन चंद्रन, चिंतन पटेल, वैभव गोवेकर, प्रशांत केकाणे, राजेश सावंत, अमेय जाधव, विराज दोशी, प्रशांत यादव, संजय लोणे, संदिप खांबे, सुनील जंगम, अंकुश माने, दिलीपराज पवार, धीरज देशमुख, स्वप्नील माळी, जितेंद्र तारमाळे, रुक्मिणी त्रिवेदी, संजय सुर्वे, अतुल गुप्ता, निखिल केरकर, सागर कड, महेश कश्यत, अमरीश कल्लूर, भास्कर ऐनकर, विजय नागावकर, किशोर मोरे, भरत खरिवले, गगन टाक, राजेश प्रजापती, विश्वास खेतले, अभिजित साजेकर, आशिष कदम आदी कार्य करीत आहेत.