श्रद्धेच्या ठिकाणी उपमुख्यमंत्री शिंदे यांचा विकासाचा संकल्प
२८८ कोटींच्या भीमाशंकर विकास आराखड्यातून भक्तीबरोबर पर्यटन आणि स्थानिक अर्थव्यवस्थेलाही बळ

श्री क्षेत्र भीमाशंकर हे केवळ श्रद्धेचे केंद्र न राहता पर्यटन, स्थानिक रोजगार आणि अर्थव्यवस्थेला चालना देणारे विकसित तीर्थक्षेत्र म्हणून पुढे यावे, या दिशेने राज्य शासनाने महत्त्वाचे पाऊल टाकले आहे. भीमाशंकरच्या विकासासाठी २८८ कोटी रुपयांचा विकास आराखडा मंजूर झाला असून, त्याच्या कामाला सुरुवात झाली आहे. यासोबतच भीमाशंकरवाडीच्या पुनर्वसनासाठी १९३ कोटी रुपये आणि परिसरातील रस्त्यांसाठीही निधी मंजूर करण्यात आला असल्याची माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.
श्री क्षेत्र भीमाशंकर मंदिरात दर्शन घेतल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना उपमुख्यमंत्री शिंदे यांनी महाराष्ट्राच्या सुख-समृद्धीसाठी प्रार्थना केल्याचे सांगितले. महाराष्ट्रातील जनतेच्या आयुष्यात सुख, समाधान आणि आनंद नांदावा, बळीराजा सुखी व्हावा तसेच शेतकऱ्यांवरील सर्व संकटे दूर व्हावीत, अशी प्रार्थना भगवान भीमाशंकराच्या चरणी केल्याचे त्यांनी सांगितले.
भीमाशंकरला दरवर्षी लाखो भाविक दर्शनासाठी येतात. त्यामुळे या ठिकाणी केवळ धार्मिक सुविधाच नव्हे, तर भाविकांना आवश्यक असलेल्या पायाभूत सुविधा अधिक सक्षम करण्याची गरज आहे. याच पार्श्वभूमीवर शासनाने २८८ कोटी रुपयांचा विकासt आराखडा मंजूर केला असून त्याचे काम सुरू झाले आहे. या आराखड्यामुळे भीमाशंकर परिसराच्या नियोजनबद्ध विकासाला गती मिळणार असून, भाविकांच्या सुविधांमध्येही मोठी वाढ होण्याची अपेक्षा आहे.
भीमाशंकर हे धार्मिकदृष्ट्या महत्त्वाचे ठिकाण असण्यासोबतच निसर्गसंपन्न परिसरामुळे पर्यटनाच्या दृष्टीनेही महत्त्वाचे आहे. विकास आराखड्याच्या माध्यमातून पायाभूत सुविधा अधिक सक्षम झाल्यास देशभरातून येणाऱ्या भाविक-पर्यटकांसाठी हे ठिकाण अधिक सोयीचे आणि आकर्षक होणार आहे. परिणामी परिसरातील पर्यटन व्यवसायाला चालना मिळून स्थानिक पातळीवर रोजगार आणि व्यवसायाच्या नव्या संधी निर्माण होण्यास मदत होणार आहे.
तीर्थक्षेत्राच्या विकासासोबत स्थानिक नागरिकांच्या प्रश्नांकडेही शासनाने लक्ष दिले आहे. भीमाशंकरवाडीच्या पुनर्वसनासाठी १९३ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. तसेच परिसरातील रस्त्यांसाठीही निधी मंजूर झाला असल्याचे शिंदे यांनी सांगितले. त्यामुळे भाविकांसाठी सुविधा निर्माण करण्याबरोबरच स्थानिक नागरिकांच्या मूलभूत गरजा आणि पायाभूत सुविधांनाही विकासाच्या प्रक्रियेत स्थान मिळणार आहे.
शासनाच्यावतीने हाती घेतलेली सर्व कामे निर्विघ्नपणे पूर्ण होतील आणि भीमाशंकरला येणाऱ्या लाखो भाविकांना त्याचा लाभ मिळेल, असा विश्वास शिंदे यांनी व्यक्त केला. या सुविधांमुळे भाविकांचा आनंद द्विगुणित होईल, तसेच परिसराच्या विकासाला नवी गती मिळेल, असे त्यांनी सांगितले.
लाडकी बहीण, लाडका भाऊ, शेतकरी, युवा, कामगार, कष्टकरी आणि वारकरी अशा महाराष्ट्रातील सर्व घटकांच्या सुख-समाधानासाठी भगवान भीमाशंकराच्या चरणी प्रार्थना केल्याचेही शिंदे यांनी सांगितले. महाराष्ट्रातील जनतेवर भगवान भीमाशंकराचा आशीर्वाद कायम राहावा, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
यावेळी आमदार शरद सोनवणे, मावळ लोकसभा सह – संपर्क प्रमुख विकास रेपाळे आणि शिवसेनेचे सर्व प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
…..