
ठाणे रेल्वे स्थानकातील नविन सार्वजनिक शौचालय, एक्सलेटरच्या कामाला गती देणे, फलाटांवर मुबलक पिण्याचे पाणी उपलब्ध करुन देणे, वैद्यकिय कक्ष कायान्वयित करणे, पावसाळापूर्व कामे तातडीने पुर्ण करणे, दिघा विभागातील इलठणपाडा येथिल रेल्वेच्या मालकीचे `मोगली धरण’ नवी मुंबई महापालिकेकडे हस्तांतरीत करणे आदी विविध विकासकामांना गती देण्यासाठी आज बुधवार, दि. २० मे रोजी ठाणे लोकसभेचे खासदार नरेश म्हस्के आणि मध्य रेल्वेचे डीआरएम हिरेश मीना यांचा संयुक्त पाहणी दौरा संपन्न झाला. हरिष मीना यांनी तातडीने अपूर्ण कामे पूर्ण करण्याचे आदेश रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिले. ठाणे पूर्व आणि पश्चिम दरम्यान मायक्रो टनेलचे काम पूर्ण झाल्याने पावासात रुळांवर पाणी साचणार नसून मुलुंड दिशेला पादचारी पूलाला मंजूरी मिळाल्याने खासदार नरेश म्हस्के यांनी समाधान व्यक्त केले. तसेच लवकरच ठाणे पूर्व येथिल सॅटिस पूलावरुन टीएमटीची वाहतूक सुरु होईल, अशी माहिती खासदार नरेश म्हस्के यांनी दिली.
ठाणे रेल्वे स्टेशनवरील विविध प्रलंबित प्रश्न, रखडलेली कामे आणि प्रवाशांच्या गैरसोयींचा आढावा घेण्यासाठी खासदार नरेश म्हस्के यांनी मध्य रेल्वे प्रशासनाचे डीआरएम हिरेश मीना आणि वरिष्ठ रेल्वे अधिकारी यांचा पाहणी दौरा आयोजित केला होता. या दौऱ्यात संपूर्ण ठाणे स्थानक परिसराची पाहणी केली गेली. त्यानंतर स्टेशन मास्तर यांच्या कक्षात रेल्वे प्रशासन, ठाणे महापालिका, प्रवासी संघटना आणि लोकप्रतिनीधी यांची बैठक संपन्न झाली.
डी-मार्टच्या सीएसआर फंडातून ठाणे रेल्वे स्थानकावर स्वच्छतागृह उभारण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. मात्र या कामात मोठी दिरंगाई होत असल्याबाबत खासदार नरेश म्हस्के यांनी रेल्वे प्रशासनाकडे तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. प्रवाशांची गैरसोय लक्षात घेता हे कामे तातडीने पूर्ण करण्याची सूचना त्यांनी केली.
प्लॅटफॉर्म क्रमांक ५ आणि ६ वरील सरकत्या जिन्यांचे काम अत्यंत धीम्या गतीने सुरू असल्याने त्यालाही गती देण्याची मागणी करण्यात आली. तसेच पावसाळ्यापूर्वी नालेसफाईची कामे पूर्ण करून पाणी तुंबण्याची समस्या टाळण्याची सूचना खासदार नरेश म्हस्के यांनी केली.
लवकरच ठाणे स्थानकावर १५ डब्यांच्या लोकल गाड्या सुरू होणार असल्याने प्लॅटफॉर्मची लांबी वाढवण्याचे काम वेगाने पूर्ण करण्याबाबत चर्चा झाली.
नवी मुंबई आणि परिसरातील पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर रेल्वेच्या ताब्यात असलेल्या मोगली धरणाचा विषयही बैठकीत उपस्थित करण्यात आला. हे धरण सध्या नादुरुस्त असून रेल्वे प्रशासन त्याचा वापर करत नसल्याचे सांगण्यात आले. नवी मुंबई महापालिकेच्या ताब्यात हे धरण दिल्यास परिसरातील पाण्याची समस्या मोठ्या प्रमाणात दूर होऊ शकते, यासाठी खासदार नरेश म्हस्के यांच्या मार्गदर्शनाखाली नवी मुंबईतील नगरसेविका सौ. चांदणी विजय चौगुले, अॅड. श्वेता सुभाष काळे, गौरी किशोर आंग्रे यांनी डीआरएम हिरेश मीना यांना लेखी निवेदन बैठकीत दिले.
बी केबिन परिसरातील रहिवशांच्या घरांना निष्कासनाची नोटीस रेल्वे प्रशासनाने बजावली आहे. यामुळे स्थानिक नागरिक बेघर होण्यापासून वाचविण्यासाठी तोडगा काढण्यासाठी बैठकीत चर्चा करण्यात आली.
ठाणे रेल्वे स्थानकाचा सर्वांगीण विकास, प्रवाशांच्या सुविधा आणि भविष्यातील वाढती वाहतूक लक्षात घेऊन विविध विकासकामे सुरू आहेत. त्यासाठी आवश्यक निधीही मंजूर झाला आहे. आज रेल्वे प्रशासनासमवेत सकारात्मक चर्चा झाली असून कामे तातडीने सुरु होऊन प्रवाशांचा प्रवास अधिक सुखकर होईल, असा विश्वास यावेळी प्रसिध्दी माध्यमांशी बोलतांना खासदार नरेश म्हस्के यांनी व्यक्त केला.
यावेळी मध्य रेल्वेचे डीआरएम हिमेश मीना यांनीही सुरू असलेल्या विकासकामांबाबत माहिती दिली. ते म्हणाले की, “ठाणे रेल्वे स्थानकावर विविध प्रकारची विकासकामे सध्या सुरू आहेत. प्रवाशांना कमीत कमी त्रास होईल याची काळजी घेत ही कामे वेगाने पूर्ण करण्याचा आमचा प्रयत्न आहे. काही मोठ्या प्रकल्पांना, विशेषत सॅटीस सारख्या कामांना थोडा वेळ लागणार असला तरी ते कामे शक्य तितक्या लवकर पूर्ण करण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील आहे.
ते पुढे म्हणाले, “पावसाळ्यापूर्वीची सर्व आवश्यक कामे वेळेत पूर्ण करण्यासाठी आम्ही विशेष लक्ष देत आहोत. रेल्वे सेवा सुरळीत ठेवणे आणि गाड्या वेळेत सोडणे हे आमचे प्रथम कर्तव्य आहे. त्या दृष्टीने जे काही अडथळे किंवा समस्या आहेत त्या टप्प्याटप्प्याने दूर करण्याचे काम सुरू आहे.
यावेळी भाजपच्या विधान परिषदेच्या आमदार माधवी नाईक, शिवसेना ठाणे शहर प्रमुख हेमंत पवार, भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक संजय वाघुले, माजी नगरसेवक भास्कर पाटील, शिवसेना ठाणे लोकसभा सचिव बाळा गवस, ठाणे विधानसभा सचिव संजीव कुलकर्णी, किरण नाकती, रमाकांत पाटील, विकास पाटील, निखिल बुडजडे, विधानसभा समन्वयक प्रकाश पायरे, विभाग प्रमुख प्रशांत पाटील, सचिन माने, वृषाली वाघुले, संतोष बोडके, किरण नक्की, ज्येष्ठ शिवसैनिक प्रीतम राजपूत आदी पदाधिकरी आणि कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.