
ठाणे : ज्येष्ठ मनोविकारतज्ज्ञ, लेखक आणि समाजप्रबोधनकार डॉ. आनंद नाडकर्णी यांचे आज निधन झाले. त्यांच्या निधनाने वैद्यकीय, साहित्य आणि सामाजिक क्षेत्रात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
डॉ. आनंद नाडकर्णी यांचे पार्थिव ठाण्यातील सरस्वती मंदिर ट्रस्ट च्या आवारात अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. यावेळी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपस्थित राहून त्यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले तसेच नाडकर्णी कुटुंबीयांचे सांत्वन केले.
यावेळी खासदार नरेश म्हस्के, शिवसेनेचे नौपाडा विभागप्रमुख किरण नाकती यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
डॉ. नाडकर्णी यांनी मानसशास्त्र आणि मानसिक आरोग्य क्षेत्रात मोठे योगदान दिले. त्यांनी मानसिक आरोग्य जनजागृतीसाठी अनेक उपक्रम राबवले. त्यांनी स्थापन केलेल्या IPH या स्वयंसेवी संस्थेमार्फत सत्तरहून अधिक मानसिक आरोग्य तज्ज्ञ एकाच छताखाली कार्यरत होते. या संस्थेमार्फत आधार गट, शैक्षणिक प्रकल्प, दृकश्राव्य उपक्रम तसेच ‘मैत्र’ टेलिफोनिक हेल्पलाइनसारख्या सेवा चालवल्या जात होत्या.
साहित्य क्षेत्रातही त्यांनी आपला वेगळा ठसा उमटवला. ‘गद्धेपंचविशी’ आणि ‘विषादयोग’ या पुस्तकांना महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार मिळाला होता. तसेच ‘रंग माझा वेगळा’, ‘असेच आम्ही सारे’ ही व्यावसायिक नाटके आणि ‘मयसभा’ या नाटकासाठी त्यांना लेखन पुरस्कार प्राप्त झाला होता.
डॉ. नाडकर्णी यांनी मराठीत १७ हून अधिक पुरस्कारप्राप्त पुस्तके लिहिली असून, त्यांच्या अनेक पुस्तकांचे इंग्रजी तसेच ब्रेल लिपीत रूपांतर करण्यात आले आहे. त्यांनी रिलायन्स, सिमेन्स, सिप्ला, इंडोको यांसारख्या औद्योगिक समूहांसोबत समुपदेशन आणि कॉर्पोरेट मार्गदर्शन क्षेत्रातही कार्य केले होते.
त्यांच्या निधनाने मानसिक आरोग्य, साहित्य आणि सामाजिक क्षेत्रातील एक संवेदनशील आणि अभ्यासू व्यक्तिमत्त्व हरपल्याची भावना व्यक्त केली जात आहे.