
ठाणे: दिवाळीचा सण म्हणजे आनंद, उत्साह आणि एकमेकांशी नाती दृढ करण्याचा सण. याच भावनेतून ‘आम्ही Cycle प्रेमी फाउंडेशन’च्यावतीने सर्व सायकलप्रेमींसाठी दिवाळी फराळाचे आयोजन करण्यात आले होते. यानिमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या दिवाळी फराळ राईडमध्ये सायकलप्रेमींनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.
ठाणे महानगरपालिका ते उपवन आणि तेथून डॉ. राजेश मढवी यांच्या कार्यालयापर्यंत या राईडचे आयोजन करण्यात आले होते. अमोल कुळकर्णी, गणेश कोळी, निखिल शिवलकर, ज्ञानदेव जाधव, रोहित मांडवकर आणि चंद्रशेखर जगताप यांनी राईडचे नेतृत्व केले.
राईडनंतर सर्व सायकलप्रेमींनी एकत्र येत पारंपरिक दिवाळी फराळाचा आस्वाद घेतला. यावेळी सायकलिंगचे अनुभवांवर चर्चा रंगली. डोंबिवली येथून आलेल्या सायकल सखी या ग्रुपने कार्यक्रमाचा उत्साह वाढवला. अध्यक्षा सुवर्णा राणे यांनी आपल्या पंढरपूर येथे करण्यात आलेल्या सायकलवारीचा अनुभव देखील कथन केला. केवळ सायकलिंगपुरते मर्यादित न राहता सायकलप्रेमींमध्ये स्नेह, संवाद आणि आपुलकीचे नाते निर्माण व्हावे, हा या आयोजनामागील मुख्य हेतू असल्याचे संस्थेच्या संस्थापिका अध्यक्षा प्रज्ञा म्हात्रे यांनी सांगितले.
‘दुर्गे दुर्घट भारी’ चॅलेंजच्या विजेत्यांचा सन्मान
याच कार्यक्रमात नवरात्रीनिमित्त ‘आम्ही Cycle प्रेमी फाउंडेशन’च्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘दुर्गे दुर्घट भारी’ नवरात्री सायकलिंग चॅलेंज २०२६ मधील विजेत्यांचा पारितोषिक वितरण सोहळाही पार पडला. या स्पर्धेचे परीक्षण प्रोफेशनल सायकलिस्ट तुषार डोके यांनी केले होते.
नगरसेविका प्रतिभा मढवी, मृणाल पेंडसे, प्रसिद्ध सायकलिस्ट राजेश सिंह, इतिहास अभ्यासक प्रशांत ठोसर आणि राजू शहा यांच्या हस्ते विजेत्यांना मेडल आणि ट्रॉफी देऊन गौरविण्यात आले. या कार्यक्रमासाठी डॉ. राजेश मढवी यांचे मोलाचे सहकार्य लाभले. तसेच फराळाच्या आयोजनासाठी कुटीरउद्योगचे संचालक सिद्धार्थ जोशी आणि राज स्नॅक्स पोळी भाजी केंद्राचे प्रशांत ठोसर यांनी सहकार्य केले. सुनील रोकडे, दुर्गा गोरे, नरेश मालुसकर, शुभांगी भोर, रोहन होमकर यांनी कार्यक्रमाचे व्यवस्थापन केले.
स्पर्धेतील विजेते पुढीलप्रमाणे :
प्रोफेशनल सायकलिस्ट – महिला गट
१. ज्योती गुप्ता – प्रथम (ठाणे)
२. डॉ. भावना भगत – द्वितीय (नांदेड)
प्रोफेशनल सायकलिस्ट – पुरुष गट
१. ऋषिराज टिल्लू – प्रथम (ठाणे)
२. नरेंद्र डोंगरे – द्वितीय (ठाणे)
३. जयप्रकाश परब – तृतीय (मुलुंड)
हौशी सायकलिस्ट – पुरुष गट
१. भूषण खडकीकर – प्रथम (मुलुंड)
२. धनंजय देशपांडे – द्वितीय (ठाणे पूर्व)
३. संदीप येवले – तृतीय (पुणे)