
ठाणे : ऑर्गनायझेशन फॉर राईट्स ऑफ ह्युमन (ऑफ्रोह) महाराष्ट्र संघटनेच्या राज्याध्यक्षपदी डॉ दिपक केदार यांची निवड करण्यात आली आहे. तर नरेंद्र निमजे यांच्याकडे संघटनेच्या महासचिवपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. अमरावती येथे झालेल्या राज्यस्तरीय अधिवेशनात संघटनेच्या नवीन राज्य कार्यकारिणी समितीची आगामी तीन वर्षांच्या कालावधीसाठी घोषणा करण्यात आली. डॉ दिपक केदार हे होमिओपॅथी डॉक्टर असून महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत त्यांची वित्त विभागात नेमणूक झाल्यावर अ वर्ग अधिकारी म्हणून काम पाहिले. लेखा कोषागार संचालनालयामधून सह संचालक म्हणून ते निवृत्त झाले.
ऑफ्रोह संघटना मागील सहा वर्षांपासून आदिवासींच्या संवैधानिक हक्कांसाठी लढा देत आहे. माजी राज्याध्यक्ष शिवानंद सहारकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या अधिवेशनात २०२७ ते २०२९ कालावधीसाठी नवीन पदाधिकाऱ्यांची घोषणा करण्यात आली. त्यात कार्याध्यक्षपदी सोलापूरच्या सुधाकर सुसलादी, कोषाध्यक्षपदी मनीष पंचगाम यांची नेमणूक करण्यात आली. यावेळी संघटनेच्या राज्य महिला कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. महिलाध्यक्षपदी प्रिया खापरे, महासचिवपदी वनिता नंदनवार, कार्यध्यक्षपदी भारती धुमाळ, कोषाध्यक्षपदी पुष्पाताई कोळी यांची निवड करण्यात आली. आमदार प्रविण तायडे यांनी अधिवेशनाचे रितसर उद्घाटन केले. यावेळी शिवानंद सहारकर यांनी ऑफ्रोहच्या आतापर्यंतच्या वाटचालीचा ऊहापोह केला. तर महाराष्ट्र शासन संघटित आदिवासी लोकप्रतिनिधींना हाताशी धरुन उर्वरित असंघटित आदिवासींवर कसा अन्याय करते याचा पाढा वाचला. या अधिवेशनाच्या यशस्वितेसाठी ठाणे जिल्हाध्यक्ष रोहिदास तरे, सचिव हिरामण सोनवणे, राज्य सदस्य नरेश खापरे, प्रिया रामटेककर, घनश्याम हेडाऊ, अजय कोळी, पांडुरंग नंदनवार,किशोर निमजे यांनी जबाबदारी पार पाडली.