
तब्बल सात वर्षांनंतर ठाणे शहराची प्रतिष्ठेची आणि ठाणेकरांच्या उत्साहाचे आकर्षण असलेली ‘32 वी ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉन’ येत्या 30 ऑगस्ट 2026 रोजी मोठ्या दिमाखात आणि उत्साहात पार पडणार आहे. या पार्श्वभूमीवर स्पर्धेच्या आयोजनाची तयारी, स्पर्धकांना आवश्यक सुविधा तसेच स्पर्धा मार्गावरील नियोजनाबाबत सर्व नगरसेवकांची महत्त्वपूर्ण बैठक आज घेण्यात आली. सर्व नगरसेवक, शाखाप्रमुख आणि विभागप्रमुखांनी आपल्या-आपल्या परिसरातील स्पर्धा मार्गावर प्रत्यक्ष उपस्थित राहून स्पर्धकांचा उत्साह वाढवावा आणि मॅरेथॉन यशस्वी करण्यासाठी आवश्यक ते सहकार्य करावे, असे आवाहन केले.
महापालिकेतील कै. नरेंद्र बल्लाळ सभागृहात महापौर शर्मिला पिंपळोलकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत मॅरेथॉन यशस्वी करण्यासाठी विविध बाबींवर सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी सभागृह नेते हणमंत जगदाळे, शिवसेना गटनेते पवन कदम, माजी महापौर व शिवसेना सचिव संजय मोरे, ज्येष्ठ नगरसेवक राम रेपाळे, माजी महापौर नगरसेविका मिनाक्षी शिंदे, नगरसेवक रमाकांत मढवी, ठाणे शहर विधानसभा संघटक हेमंत पवार, अतिरिक्त आयुक्त-1 मनीष जोशी तसेच ॲथलेटिक्स असोसिएशनचे पदाधिकारी उपस्थित होते.
ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉन ही 21 किलोमीटर अंतराची स्पर्धा असून ठाणे महापालिका मुख्यालय येथून सकाळी 6 वाजता स्पर्धेला सुरुवात होणार आहे. शहरातील विविध भागांतून स्पर्धक या मॅरेथॉनमध्ये सहभागी होणार असल्याने संपूर्ण स्पर्धा मार्गावर आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून देण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
मॅरेथॉनमध्ये सहभागी होणाऱ्या स्पर्धकांना धावताना कोणतीही अडचण येऊ नये, यासाठी मार्गावर स्पंजिंग पॉईंट आणि फीडिंग पॉईंट उभारण्यात येणार आहेत. या ठिकाणी स्पर्धकांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याची जबाबदारी संबंधित यंत्रणांवर सोपविण्यात आली आहे.
मॅरेथॉन ही केवळ धावण्याची स्पर्धा नसून ठाणे शहराचा क्रीडा उत्सव म्हणून तिच्याकडे पाहिले जाते. त्यामुळे स्पर्धकांना प्रोत्साहन देण्यासाठी नागरिकांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग राहावा, यासाठीही नियोजन केले जात आहे. स्पर्धा मार्गावरील विविध भागांत स्थानिक नगरसेवक, शाखाप्रमुख आणि विभागप्रमुख यांनी सकाळी लवकर उपस्थित राहून स्पर्धकांचा उत्साह वाढवावा, अशा सूचना शिवसेना गटनेते पवन कदम यांनी दिल्या.
सात वर्षांनंतर पुन्हा होत असलेल्या या मॅरेथॉनबाबत ठाणेकरांमध्येही उत्सुकता निर्माण झाली आहे. शहरातील विविध वयोगटातील नागरिकांना या क्रीडा महोत्सवाशी जोडण्याचा प्रयत्न असून, स्पर्धेच्या माध्यमातून ‘धाव प्रगतीची गतीशील ठाण्याची’ हा संदेश देण्यात येणार आहे.
स्पर्धा सुरळीत पार पडण्यासाठी महापालिका प्रशासन, ॲथलेटिक्स असोसिएशनचे पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधी यांच्यात समन्वय ठेवण्यात येणार आहे. स्पर्धा मार्गावरील सुविधा, स्पर्धकांसाठी आवश्यक व्यवस्था आणि विविध ठिकाणी स्वयंसेवकांची उपस्थिती याबाबतही नियोजन करण्यात आलेआहे.
संपूर्ण ठाणे शहराचा सहभाग आणि नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद हेच या मॅरेथॉनचे वैशिष्ट्य ठरणार असून, 30 ऑगस्ट रोजी ठाणे शहर पुन्हा एकदा धावणार आहे. महापौर वर्षा मॅरेथॉनच्या माध्यमातून ठाणेकरांमध्ये क्रीडा संस्कृती आणि आरोग्यविषयक जागरूकता अधिक बळकट होईल, असा विश्वास महापौर शर्मिला पिंपळोलकर यांनी व्यक्त केला.