रत्नागिरी- दादर पॅसेंजर पूर्ववत करा
दिवा – सावंतवाडी एक्सप्रेसचा विस्तार सीएसएमटी/ एलटीटी पर्यंत करा
कोकण रेल्वेवर नवीन ट्रेन सुरु करा
मुंबई-मडगांव वंदे भारत एक्सप्रेसची सेवा पूर्ववत करा
गणेशोत्सवासाठी जास्तीत जास्त गाड्या सोडा
खासदार नरेश म्हस्के यांची केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याशी विविध मागण्यांवर चर्चा
नवी दिल्ली – २६ लाख लोकसंख्या असलेल्या ठाणेकरांचे प्रवासाचे मुख्य साधन रेल्वे आहे. ठाणे रेल्वे स्थानकातील गर्दी कमी करण्यासाठी ठाणे ते मुलुंड रेल्वे स्थानकादरम्यान नवीन स्थानक उभारण्यात येत आहे. या कामासाठी २५० कोटींचा निधी मंजूर झाला असून तो तातडीने रेल्वे बोर्डाने वितरीत करावा, अशी प्रमुख मागणी आज खासदार नरेश म्हस्के यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेऊन केली. तसेच रत्नागिरी- दादर पॅसेंजर पूर्ववत करावी, दिवा – सावंतवाडी एक्सप्रेसचा विस्तार सीएसएमटी/ एलटीटी पर्यंत करावा, कोकण रेल्वेवर नवीन ट्रेन सुरु करावी, मुंबई-मडगांव वंदे भारत एक्सप्रेसची सेवा पूर्ववत करुन आठवड्यात ६ दिवस सुरु ठेवावी, गणेशोत्सवासाठी जास्तीतजास्त गाड्या सोडाव्यात अशा मागण्या खासदार नरेश म्हस्के यांनी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांना निवेदन देऊन केल्या.
खासदार नरेश म्हस्के यांनी आज दिल्लीत केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेऊन रेल्वेच्या विविध प्रश्नांवर सविस्तर चर्चा केली. ठाणे ते मुलुंड रेल्वे स्थानकादरम्यान नवीन स्थानक उभारण्यात येत आहे. काही काळ हे काम संथ गतीने सुरु होते. या कामासाठी २५० कोटींचा निधी रेल्वे मंत्रालयाने मंजूर केला आहे. मात्र हा निधी रेल्वे बोर्डाकडे वर्ग करण्यात आला नसल्याची बाब खासदार नरेश म्हस्के यांनी केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या निदर्शनास आणून देत तात्काळ निधी वर्ग करण्याची विनंती केली. अश्विनी वैष्णव यांनी सकारात्मकता दाखवत निधी तात्काळ वर्ग करण्याची मागणी मान्य केली.
पूर्वी धावणारी गाडी क्रमांक ५०१०३/५०१०४ रत्नागिरी-दादर पॅसेंजर ही गाडी कोकण विभागातील कष्टकरी, रोजचे प्रवासी, छोटे व्यावसायिक आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना थेट मुंबईशी जोडणारी एक प्रमुख ‘जीवनरेखा’ होती. तथापि, कोविड-19 महामारीमुळे, ही ट्रेन दादरऐवजी दिवा स्टेशनपर्यंतच मर्यादित करण्यात आली आहे. या निर्णयामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. दिवा स्टेशनवरील मर्यादित प्लॅटफॉर्म क्षमता आणि पाणी भरण्याच्या समस्येमुळे, ट्रेनला पनवेल येथे बराच वेळ थांबावे लागते, ज्यामुळे प्रवाशांचा मौल्यवान वेळ वाया जातो. शिवाय, पुढील प्रवासासाठी त्यांना दिवा स्टेशनवरून गर्दीच्या लोकल ट्रेनमधून प्रवास करावा लागतो. ज्यामुळे ज्येष्ठ नागरिक, महिला आणि लहान मुलांची प्रचंड गैरसोय होते. त्यामुळे ट्रेन क्रमांक ५०१०३/ ५०१०४ रत्नागिरी-दादर पॅसेंजर, कोविड-19 महामारीपूर्वी जशी धावत होती, तशीच पुन्हा दादर स्टेशनपर्यंत धावली पाहिजे. प्रवाशांना थेट कनेक्टिव्हिटी देण्यासाठी आणि रेल्वे संसाधनांचा जास्तीत जास्त वापर करण्यासाठी, गाडी क्रमांक १०१०५/१०१०६ दिवा-सावंतवाडी एक्सप्रेसचा विस्तार दादर, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) किंवा लोकमान्य टिळक टर्मिनस (LTT) पर्यंत करण्यात यावा अथवा तांत्रिक कारणांमुळे रत्नागिरी-दादर पॅसेंजर पुन्हा सुरू करणे शक्य नसल्यास, मुंबई आणि रत्नागिरी दरम्यान एक नवीन दैनिक गाडी तात्काळ सुरू करावी, जी सर्व स्थानकांवर (दादर, ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, संगमेश्वर, इत्यादी) थांबेल, अशी मागणी खासदार नरेश म्हस्के यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.
२२२२९/२२२३० मुंबई-मडगाव वंदे भारत एक्सप्रेस ही मुंबई, संपूर्ण कोकण प्रदेश आणि गोवा यांना जोडणारी एक अत्यंत लोकप्रिय प्रीमियम रेल्वे सेवा आहे. जून २०२३ मध्ये सुरू झाल्यापासून, या ट्रेनला पर्यटक, व्यावसायिक प्रवासी, विद्यार्थी आणि कोकण रहिवाशांकडून अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला आहे. तथापि, वर्षभर सातत्याने १०० टक्क्यापेक्षा जास्त बुकिंग होऊनही, ही ट्रेन सध्या केवळ ८ डब्यांसह धावत आहे. पावसाळी वेळापत्रकामुळे या ट्रेनची सध्याची वारंवारता कमी करण्यात आली आहे, ज्यामुळे प्रवाशांना मोठा मानसिक आणि शारीरिक त्रास होत आहे. कोकण रेल्वेचा रोहा-मडगाव विभाग आधीच अंदाजे 168 टक्के क्षमतेने कार्यरत आहे. या अत्यंत व्यस्त आणि गर्दीच्या मार्गावर वंदे भारत एक्सप्रेससारख्या महत्त्वाच्या ट्रेनच्या फेऱ्या कमी केल्यामुळे प्रवाशांची जागांसाठी मोठी प्रतीक्षा यादी तयार झाली आहे. पावसाळ्यात कोकणात प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या लक्षणीयरीत्या जास्त असते. ही गरज लक्षात घेता, प्रवासी वाहतूक सुलभ करण्यासाठी आणि रेल्वेचा महसूल वाढवण्यासाठी २२२२९/२२२३० मुंबई-मडगाव वंदे भारत एक्सप्रेसची आठवड्यातून सहा दिवस चालणारी सेवा संपूर्ण पावसाळ्यात सुरू ठेवावी. तसेच कोकणातील जनतेचे आणि रेल्वे प्रवाशांचे व्यापक हित लक्षात घेऊन या विषयावर सकारात्मक आणि त्वरित निर्णय घेण्याची विनंती खासदार नरेश म्हस्के यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.