‘जनता त्रस्त, मोदी परदेशी वारीत व्यस्त’….रद्द करा रद्द करा, इंधन दरवाढ रद्द करा…ट्रंप बोले, मोदी डोले….

केंद्र सरकार विरोधात ठाणे स्टेशन परिसर दुमदुमले
ठाणे, ता. १८ प्रतिनिधी – देशात सातत्याने वाढणारी महागाई, पेट्रोल-डिझेल, गॅसचे गगनाला भिडलेले दर आणि केंद्र सरकारच्या अपयशी आर्थिक धोरणांविरोधात आज शिवसेना (उद्धब बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने ठाणे स्टेशन परिसरात तीव्र निषेध आंदोलन करण्यात आले. यावेळी संतप्त शिवसैनिकांनी केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला. ‘जनता त्रस्त, मोदी परदेशी वारीत व्यस्त’….रद्द करा रद्द करा, इंधन दरवाढ रद्द करा…ट्रंप बोले, मोदी डोले…. अशा घोषणा शिवसैनिकांनी दिल्या. वाढत्या महागाईच्या राक्षसाविरोधात शिवसेनेने जोरदार आंदोलन केले. तसेच वाढत्या महागाईविरोधात सर्वसामान्य नागरिकांची स्वाक्षरी मोहीमही राबवण्यात आली, त्याला जनतेने उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
पाच राज्यातील निवडणुकांत हजारो लिटर इंधन भाजपने मोटारीतून प्रचारासाठी वापरले, मोदींनी प्रचारासाठी विमानातून प्रवास केला. इंधनवाढ होऊ देणार नाही, असे खोटे आश्वासन दिले. जागतिक स्थिती माहिती असतानाही मोदींनी इंधनाची, पैशांची उधळपट्टी केली आणि निवडणुका आटपताच जनतेला महागाईच्या खाईत लोटून परदेश दौर्यावर निघून गेले आहेत. ही कृतीच संतापजनक असून महागाई वाढण्यास केंद्रातील सरकारची चुकीची आर्थिक धोरणे आणि अपयशी ठरलेली परराष्ट्र नीती पूर्णपणे जबाबदार असल्याची टीका शिवसेना नेते व माजी खासदार राजन विचारे यांनी यावेळी केली. तसेच अच्छे दिन’च्या नावाखाली सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लावून हे सरकार केवळ मूठभर उद्योगपतींचे हित जपत असल्याचे विचारे यांनी सांगितले. या आंदोलनात जिल्हाप्रमुख केदार दिघे, संपर्कप्रमुख नरेश मणेरा, माजी नगरसेविका नंदिनी विचारे, ठाणे महानगर संघटक महेश कदम यांच्यासह उपजिल्हाप्रमुख सुनील पाटील, महिला जिल्हा संघटिका रेखाताई खोपकर, पदाधिकारी प्रतिक राणे, हेमचंद्र राठिवडेकर, अमोल हिंगे, महेश्वरी तरे, ज्योती कोळी, प्रमिला भांगे, सुनंदा देशपांडे, राम काळे, राजेंद्र महाडिक, प्रदीप वाघ आणि शेकडो शिवसैनिक व नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.