अमित शहांच्या उपस्थितीत अंबाबाई मंदिर विकास प्रकल्पाचा शुभारंभ
कोल्हापुरात विकासाची पंचगंगा वाहणार
मोदी-शहा यांच्या सांस्कृतिक पुनरुत्थानाच्या संकल्पनेला राज्यात बळ – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

श्री महालक्ष्मी अंबाबाई मंदिराच्या दीड हजार कोटी रुपयांच्या आधुनिकीकरण व सुशोभीकरण प्रकल्पाच्या या ऐतिहासिक प्रकल्पामुळे कोल्हापुरात “विकासाची पंचगंगा वाहणार” आहे. दक्षिण काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या नगरीला जागतिक धार्मिक पर्यटनाच्या नकाशावर नवे स्थान मिळेल, असा विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. सांस्कृतिक पुनरुत्थान, पर्यटनवृद्धी, रोजगारनिर्मिती आणि स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना देणारा हा प्रकल्प कोल्हापूरच्या विकासाचे नवे पर्व ठरेल, असेही त्यांनी सांगितले.
श्री महालक्ष्मी (अंबाबाई) मंदिराच्या आधुनिकीकरण व सुशोभीकरण प्रकल्पाचा शुभारंभ केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते आज पार पडला. त्याप्रसंगी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मार्गदर्शन करताना बोलत होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी उपमुख्यमंत्री शिंदे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे कोल्हापूर नगरीत मनःपूर्वक स्वागत केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री रवींद्र चव्हाण, हसन मुश्रीफ, आशिष शेलार, चंद्रकांत पाटील, शिवेंद्रराजे भोसले, माधुरी मिसाळ, खासदार धनंजय महाडिक, आमदार, महायुतीचे पदाधिकारी तसेच मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या नागरिकांचेही त्यांनी स्वागत केले.
शिंदे म्हणाले की, अंबाबाई मंदिराच्या आधुनिकीकरण आणि सुशोभीकरणाच्या कामाचा शुभारंभ हा केवळ कोल्हापूरसाठी नव्हे, तर महाराष्ट्र आणि देशाच्या सांस्कृतिक इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिला जाईल असा दिवस आहे. दक्षिण काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या पवित्र नगरीला जागतिक धार्मिक पर्यटनाच्या नकाशावर दैदिप्यमान स्थान मिळवून देण्याची क्षमता या प्रकल्पात आहे.
अमित शहा यांचे कोल्हापूरशी असलेले भावनिक नाते अधोरेखित करताना शिंदे म्हणाले की, कोल्हापूर हे त्यांचे सासर असल्याने या प्रकल्पाच्या शुभारंभानंतर त्यांच्या गृहलक्ष्मीही अधिक प्रसन्न होतील. कोल्हापूरबद्दल अमित शहा यांना विशेष प्रेम असून, त्यांच्या उपस्थितीमुळे या विकासकामाला अधिक बळ मिळाले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशात सुरू असलेल्या सांस्कृतिक पुनरुत्थानाचा उल्लेख करताना त्यांनी काशी विश्वनाथ कॉरिडॉर, अयोध्या राम मंदिर आणि उज्जैनमधील महाकाल मंदिर लोक प्रकल्पांचा संदर्भ दिला. “भारताने आपला आत्मा ओळखला आहे,” असे सांगत देशभरातील धार्मिक आणि सांस्कृतिक वारशाच्या संवर्धनाला नवी दिशा मिळाल्याचे त्यांनी नमूद केले.
स्वदेश दर्शन योजनेच्या माध्यमातून देशातील धार्मिक आणि सांस्कृतिक स्थळांचा विकास होत असल्याचे सांगताना शिंदे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या बारा वर्षांत देशाला जागतिक स्तरावर नवी प्रतिष्ठा मिळवून दिली आहे. सातासमुद्रापार भारताचा गौरव पोहोचविण्यात त्यांचे नेतृत्व महत्त्वाचे ठरले असून, त्या प्रवासात अमित शहा सावलीसारखे त्यांच्या पाठीशी उभे राहिले आहेत.
अमित शहा यांच्या नेतृत्वातील राष्ट्रीय सुरक्षेच्या उपाययोजनांचा उल्लेख करताना शिंदे म्हणाले की, देशातील नागरिकांच्या मनात सुरक्षिततेची भावना निर्माण करण्याचे काम त्यांनी केले आहे. आतंकवाद आणि नक्षलवादाविरोधात कठोर भूमिका घेत देशाला नवी दिशा दिली आहे. जम्मू-काश्मीरमधील कलम 370 हटविण्याचा ऐतिहासिक निर्णय असो किंवा देशातून नक्षलवादाचे उच्चाटन करण्याचा निर्धार असो, अमित शहा यांनी घेतलेले निर्णय देशहिताचे ठरले आहेत. 2026 पर्यंत देश नक्षलवादमुक्त करण्याच्या दिशेने मोठी वाटचाल सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.
गडचिरोलीसह देशातील नक्षलग्रस्त भागांमध्ये विकास आणि शांतता प्रस्थापित करण्यासाठी अमित शहा यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावल्याचे सांगताना शिंदे म्हणाले की, “ते बोलतात ते करून दाखवतात.” त्यांनी दिलेला शब्द म्हणजे “पत्थर की लकीर” असून, एखाद्याच्या पाठीशी ते डोंगरासारखे उभे राहतात, असेही त्यांनी नमूद केले.
केंद्रीय गृहमंत्रीपदाबरोबरच सहकार मंत्री म्हणूनही अमित शहा यांनी महत्त्वपूर्ण कामगिरी बजावल्याचे शिंदे यांनी सांगितले. पूर्वी काही मोजक्या लोकांच्या हातात असलेले सहकार क्षेत्र सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्याचे काम त्यांनी केले. सहकार क्षेत्रात व्यापक सुधारणा घडवून आणत शेवटच्या घटकापर्यंत लाभ पोहोचविण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे.
साखर कारखाने आणि शेतकरी अडचणीत असताना त्यांच्या मागण्यांना प्रतिसाद देत सुमारे दहा हजार कोटी रुपयांचा आयकर माफ करण्याचा ऐतिहासिक निर्णय अमित शहा यांनी घेतल्याचेही शिंदे यांनी सांगितले. इथेनॉल आणि अन्य उपउत्पादनांना न्याय देणारे निर्णय घेत सहकार क्षेत्र अधिक सक्षम करण्याचे काम त्यांनी केले आहे.
अंबाबाई मंदिराच्या सुमारे दीड हजार कोटी रुपयांच्या विकास प्रकल्पाचा आज प्रारंभ होत असून, महाराष्ट्र सरकारदेखील राज्यातील विविध मंदिरांच्या विकास आणि सुशोभीकरणासाठी मोठ्या प्रमाणावर काम करत असल्याचे शिंदे यांनी स्पष्ट केले. राज्यातील तीर्थक्षेत्रे, प्राचीन मंदिरे, गड-किल्ले आणि ऐतिहासिक वास्तूंचे जतन, संरक्षण आणि पुनरुत्थान करण्यासाठी महायुती सरकार कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले.
देशभरातील तीर्थक्षेत्रांचा विकास, सांस्कृतिक परंपरांचे जतन आणि धार्मिक वारशाचे संवर्धन यासाठी केंद्र आणि राज्य सरकार समन्वयाने काम करत असल्याचे नमूद करताना त्यांनी महाराष्ट्रातील अनेक विकास प्रकल्पांचा उल्लेख केला.
कोल्हापूर दौऱ्यांमुळे राज्याला विकासाची नवी ऊर्जा मिळते, असे सांगताना शिंदे म्हणाले की, “अमितभाई, आपण जेव्हा जेव्हा महाराष्ट्रात येता तेव्हा विकासकामांचे भूमिपूजन आणि लोकार्पण होते. त्यामुळे आम्हाला प्रेरणा, ऊर्जा आणि अधिक जोमाने काम करण्याची ताकद मिळते.”
आपल्या भाषणाच्या शेवटी शिंदे यांनी हिंदीत भावना व्यक्त करत म्हटले की, “जनता की हर मांग आपने पूरी कर दी है, रुके हुए हर काम को आपने रफ्तार दी है. आपकी बदौलत यहां विकास की पंचगंगा बहेगी और मां अंबाबाई मंदिर का नवनिर्माण एक मिसाल बन जाएगा.”
अंबाबाई मंदिर विकास प्रकल्प हा केवळ मंदिर परिसराच्या सुशोभीकरणापुरता मर्यादित नसून कोल्हापूरच्या सांस्कृतिक, धार्मिक, पर्यटन आणि आर्थिक विकासाला नवी चालना देणारा ठरेल, असा विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.