Skip to content
June 9, 2026
  • Facebook
  • YouTube
  • Instagram
  • Tweeter
  • Whats App.

S9 TV NEWS

` S9 News
Primary Menu
  • HOME
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • देश-विदेश
  • क्रीडा
Live
  • Home
  • ताज्या बातम्या
  • भगवान बिरसा मुंडांच्या विचारांतून आदिवासी विकासाला नवी दिशा

भगवान बिरसा मुंडांच्या विचारांतून आदिवासी विकासाला नवी दिशा

S9 TV NEWS June 9, 2026
Like, Follow, Subscribe

आदिवासी शिक्षण, रोजगार व संस्कृती संवर्धनासाठी महायुती सरकारचे विशेष प्रयत्न

जल, जंगल, जमीनच्या हक्कांसाठी बिरसा मुंडांचा लढा प्रेरणादायी – एकनाथ शिंदे

आश्रमशाळांपासून उच्च शिक्षणापर्यंत आदिवासी विद्यार्थ्यांसाठी संधींचे नवे दालन

राज्यपाल, मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत बिरसा मुंडा बलिदान दिन साजरा

भगवान बिरसा मुंडा यांच्या बलिदान दिनानिमित्त आदिवासी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य सरकार कटिबद्ध असून शिक्षण, आरोग्य, रोजगार, संस्कृती संवर्धन आणि हक्कांचे संरक्षण यासाठी विविध महत्त्वपूर्ण निर्णय राबविले जात आहेत. जल जंगल आणि जमिनीच्या हक्कासाठी भगवान बिरसा मुंडा यांचा लढा प्रेरणादायी आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

राज्यपाल विष्णुदेव वर्मा यांच्या प्रमुख उपस्थितीत लोकभवनातील दरबार हॉल येथे आयोजित भगवान बिरसा मुंडा बलिदान दिन कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री अशोक उईके, मंत्री नरहरी झिरवळ, राज्यमंत्री इंद्रनील नाईक, लोकप्रतिनिधी, खासदार, आमदार तसेच मोठ्या संख्येने आदिवासी बांधव उपस्थित होते.

भगवान बिरसा मुंडा यांना अभिवादन करताना उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, अवघ्या २५ व्या वर्षी देशासाठी हसत-हसत बलिदान देणारे बिरसा मुंडा हे आदिवासी स्वाभिमानाचे प्रतीक होते. जल, जंगल आणि जमीन या आदिवासी अस्मितेच्या लढ्याचे ते तेजस्वी नेतृत्व होते. शोषण, अन्याय आणि अत्याचाराविरोधातील संघर्षाची मशाल म्हणजे बिरसा मुंडा. दिनदुबळ्यांचा आत्मविश्वास, प्राणपणाने लढण्याची प्रेरणा आणि “मोडेन पण वाकणार नाही” ही वृत्ती त्यांच्या जीवनातून दिसून येते.

१९व्या शतकातील जननायक असलेल्या बिरसा मुंडा यांनी “अबुआ राज एते जाना, महारानी राज टुंडू जाना.”चा एल्गार देत ब्रिटिश सत्तेविरुद्ध आदिवासी समाजाला एकत्र आणले. त्यांच्या नेतृत्वाखाली आदिवासींनी अन्यायाविरोधात उभारलेला संघर्ष इतिहासात अजरामर झाला. ब्रिटिशांनी त्यांना अटक करून छळ केला आणि ९ जून १९०० रोजी कारागृहात त्यांचे निधन झाले. मात्र, केवळ २५ वर्षांचे आयुष्य जगूनही ते अमर झाले, असे शिंदे यांनी नमूद केले.

भगवान बिरसा मुंडा यांच्यासह स्वातंत्र्यलढ्यात योगदान देणाऱ्या १५ आदिवासी क्रांतिकारकांना यावेळी त्यांनी विनम्र अभिवादन केले. तसेच राज्यपाल विष्णुदेव वर्मा यांनी आदिवासी विकासासाठी केलेल्या कार्याचे विशेष कौतुक करत त्रिपुराचे उपमुख्यमंत्री आणि विविध राज्यांचे राज्यपाल म्हणून त्यांनी आदिवासी समाजाच्या प्रश्नांवर सातत्याने काम केल्याचे सांगितले.

कार्यक्रमात करण्यात आलेल्या वृक्षारोपण उपक्रमाचा उल्लेख करताना शिंदे म्हणाले की, जल-जंगल-जमीन हा आदिवासी समाजाचा श्वास असून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देतानाच आदिवासींच्या जीवनमूल्यांची जाणीव समाजाला करून देण्याचे महत्त्वपूर्ण कार्य या उपक्रमातून झाले आहे.
भगवान बिरसा मुंडा यांनी अंधश्रद्धा, व्यसनाधीनता आणि सामाजिक वाईट प्रथांविरोधात जनजागृती केली. स्वच्छता, नैतिकता आणि एकतेचा संदेश दिला. आदिवासी समाजाने त्यांना ईश्वरी अवतार मानले असले तरी स्वतःला देव न म्हणता त्यांनी समाजसेवेला प्राधान्य दिले. त्यामुळेच त्यांना “धरती आबा” म्हणून ओळख मिळाली, असेही शिंदे म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भगवान बिरसा मुंडा यांचा जन्मदिन ‘जनजातीय गौरव दिवस’ म्हणून साजरा करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतल्याचा उल्लेख करत शिंदे म्हणाले की, आदिवासींच्या स्वातंत्र्यलढ्यातील योगदानाचे राष्ट्रीय स्तरावर स्मरण व्हावे, हा त्यामागील उद्देश होता. केंद्र सरकारने आदिवासी समाजासाठी अर्थसंकल्पीय तरतूद पाचपट वाढवून विकासाला गती दिली आहे.

महाराष्ट्र सरकारही आदिवासी बांधवांना न्याय देण्यासाठी कटिबद्ध असल्याचे सांगताना शिंदे यांनी अनेक महत्त्वाच्या उपक्रमांची माहिती दिली. आदिवासींच्या हक्कांसाठी जुन्या कायद्यांमध्ये आवश्यक बदल करण्यात आले आहेत. आदिवासी संस्कृती, कला, लोकपरंपरा आणि उत्सवांचे जतन व संवर्धन करण्यासाठी विशेष प्रयत्न सुरू आहेत.

आदिवासी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी आश्रमशाळा स्मार्ट करण्याचे काम सुरू असून त्यांना उच्च शिक्षणाशी जोडण्याचा प्रयत्न केला जात आहे. मेडिकल व अभियांत्रिकी प्रवेशासाठी समुपदेशन सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. पीएचडी शिक्षणासाठी शिष्यवृत्ती तसेच परदेशातील उच्च शिक्षणासाठी आर्थिक तरतूद करण्यात आली आहे.
नाशिकमधील एका आदिवासी शाळेच्या भेटीचा अनुभव सांगताना शिंदे म्हणाले की, तेथील विद्यार्थ्यांची बुद्धिमत्ता आणि अभ्यासू वृत्ती पाहून ते प्रभावित झाले होते. अनेक विद्यार्थ्यांना शेकडो पाढे आणि राज्यघटनेतील कलमे तोंडपाठ होती. अशा गुणवंत विद्यार्थ्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सरकार सातत्याने प्रयत्न करत आहे.
गडचिरोलीसारख्या दुर्गम भागात विकासाची गंगा पोहोचविण्याचे काम सुरू असून उद्योग आणि गुंतवणूक वाढवून हजारो-लाखो आदिवासी युवकांना रोजगार उपलब्ध करून देण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली गडचिरोलीत औद्योगिक विकासाला चालना देण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले.

भगवान बिरसा मुंडा हे आदिवासी हक्कांच्या लढ्याचे प्रेरणास्थान असून महाराष्ट्रासह देशभरातील आदिवासी समाजासाठी त्यांचे कार्य आजही दिशादर्शक आहे. त्यांच्या बलिदान दिनानिमित्त त्यांच्या विचारांना अभिवादन करत आदिवासी समाजाच्या सर्वांगीण उन्नतीसाठी सरकारची वचनबद्धता कायम राहील, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.

Continue Reading

Previous: ठाणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची नवीन कार्यकारिणी जाहीर….
  • FwZLKEnacAA0XiF
  • img-20250602-wa00015808276882074419283.jpg
  • 473241588_9184857851597815_2764842180287072871_n
  • Facebook
  • YouTube
  • Instagram
  • Tweeter
  • Whats App.
"Copyright © 2025 | S9 TV News | MoreNews by AF themes.
Share

Facebook

X

LinkedIn

WhatsApp

Copy Link
×