महापौर शर्मिला पिंपळोलकर यांच्या हस्ते राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालयाच्या
विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक कला क्रीडा महोत्सवाचा पारितोषिक वितरण सोहळा
वैद्यकीय क्षेत्र म्हणजे केवळ अभ्यास, प्रयोगशाळा, रुग्णसेवा आणि जबाबदारी इतकंच नाही तर ते संवेदनशीलतेचं, सर्जनशीलतेचं आणि मानवतेचं क्षेत्र आहे. डॉक्टर होणे म्हणजे फक्त शरीरावर उपचार करणं नव्हे, तर मनालाही आधार देणं आहे आणि हे सामर्थ्य आपल्या कलागुणांमधूनच विकसित होत असते. वैद्यकीय शिक्षण हे निश्चितच कठीण आहे; पण त्याच वेळी स्वतःतील कलागुण जोपासणे तितकेच महत्त्वाचे असल्याचे उद्गगार महापौर शर्मिला पिंपळोलकर यांनी पारितोषिक वितरण सोहळ्याप्रसंगी केले. डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृह येथे गुरूवारी ठाणे महानगरपालिकेच्या राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालयाच्या व छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाच्या विद्यार्थ्यांनी शैक्षणिक, सांस्कृतिक, क्रीडा आणि विविध सहअभ्यासाक्रमांमध्ये उल्लेखनीय यश प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांचा पारितोषिक सोहळा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमास उपमहापौर कृष्णा पाटील, अतिरिक्त आयुक्त 1 संदीप माळवी, अतिरिक्त आयुक्त 2 प्रशांत रोडे, उपायुक्त उमेश बिरारी, जी.जी. गोदेपुरे छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. स्वप्नाली कदम यांच्यासह रुग्णालयातील डॉक्टर्स, कर्मचारी, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमास ठाणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त 1 संदीप माळवी यांनी विद्यार्थ्यांना संबोधित केले. तर छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. स्वप्नाली कदम यांनी प्रास्ताविक केले. राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालय आणि छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय, कळवा, ठाणे येथे शैक्षणिक वर्षातील सांस्कृतिक कार्यक्रम पार पडले. यामध्ये शैक्षणिक, सांस्कृतिक उपक्रम घेण्यात आले. यात विशेष प्राविण्य प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात येणार असल्याचे डॉ. स्वप्नाली कदम यांनी नमूद केले. यावर्षीचे सर्व उपक्रम Odyssey या संकल्पनेखाली आयोजित केले असून, ही संकल्पना अध्ययन, सर्जनशीलता व उत्कृष्टतेच्या प्रवासाचे प्रतीक असल्याचे त्यांनी नमूद केले.