
भक्ती विठोबाची सेवा आरोग्याची आणि आरोग्य संपन्न वारी या डिजिटल उपक्रमाची सुरुवात
आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमीवर पंढरपूर येथील केबीपी महाविद्यालयात वारकरी भाविकांना पालखी मार्ग व मुक्कामस्थळी उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या आरोग्य सुविधांचा सविस्तर आढावा घेण्यात आला.यंदाच्या वारीत प्रथमच अत्यावश्यक रुग्णांसाठी एअर ॲम्बुलन्सची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असून, सुसज्ज रुग्णवाहिका, बाईक ॲम्बुलन्स आणि तातडीच्या आरोग्य सेवांचे मजबूत जाळेही कार्यरत राहणार असल्याची माहिती सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिली. बैठकीच्या प्रारंभी आरोग्य सेवा आयुक्त तथा राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे संचालक संजय काटकर यांनी वारीसाठी आरोग्य विभागामार्फत करण्यात आलेल्या सर्वसमावेशक नियोजनाची माहिती दिली.
आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर म्हणाले की,यंदाच्या वारीत प्रथमच अत्यावश्यक रुग्णांसाठी एअर ॲम्बुलन्सची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असून, सुसज्ज रुग्णवाहिका, बाईक ॲम्बुलन्स आणि तातडीच्या आरोग्य सेवांचे मजबूत जाळेही कार्यरत राहणार आहे.भक्ती विठोबाची सेवा आरोग्याची आणि आरोग्य संपन्न वारी ‘ या डिजिटल उपक्रमांच्या माध्यमातून पालखी मार्गावरील वारकरी भाविकांना तात्काळ आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. प्रत्येक आरोग्य कर्मचारी व आशा सेविकेमार्फत आवश्यक आरोग्य माहिती आणि सेवा भाविकांपर्यंत पोहोचविण्यात येईल. तसेच वारकरी घरातून वारीसाठी निघाल्यापासून ते सुखरूप घरी परतेपर्यंत आवश्यक आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्याचे व्यापक नियोजन आरोग्य विभागाने केले असून, त्याची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या असल्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यावेळी म्हणाले.
बैठकीस आमदार समाधान आवताडे, आमदार राजू खरे, आरोग्य सेवा आयुक्त संजय काटकर, तसेच पुणे, सातारा व सोलापूर जिल्ह्यांतील प्रशासन व आरोग्य विभागाचे वरिष्ठ अधिकारी प्रत्यक्ष व दृकश्राव्य माध्यमातून उपस्थित होते. गंभीर रुग्णांना तातडीने विशेष रुग्णालयात हलविण्यासाठी एअरॲम्बुलन्स ही सेवा महत्त्वाची ठरणार आहे. याशिवाय, गर्दीच्या ठिकाणी जलद पोहोचण्यासाठी बाईक ॲम्बुलन्स, आधुनिक जीवनरक्षक उपकरणांनी सज्ज रुग्णवाहिका आणि प्रशिक्षित वैद्यकीय पथके सतत कार्यरत राहणार आहेत.आरोग्य सेवा आयुक्त तथा राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे संचालक संजय काटकर यांनी बैठकीच्याप्रारंभी वारीसाठी आरोग्य विभागाने केलेल्या व्यापक नियोजनाची माहिती सादर केली. पालखी मार्गावरील आरोग्य केंद्रे, तात्पुरती वैद्यकीय पथके, औषधसाठा, रुग्णवाहिका सेवा, आपत्कालीन प्रतिसाद व्यवस्था तसेच मनुष्यबळाची उपलब्धता याबाबतची माहिती दिली.