
इ-ट्रॅक्टर शेतकऱ्यांच्या जीवनात क्रांती घडवून आणेल!
पर्यावरण पूरक व पैशाची बचत करणारा इ- ट्रॅक्टर कृषी क्षेत्रात क्रांती घडवून आणेल, असे प्रतिपादन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केले. ते ठाणे प्रादेशिक परिवहन कार्यालयात देशातील पहिल्या इ-ट्रॅक्टरची नोंदणी करताना बोलत होते. यावेळी ठाणे प्रादेशिक परिवहन अधिकारी हेमांगिंनि पाटील, इ-ट्रॅक्टर निर्मिती करणाऱ्या ऑटोनेक्स्ट कंपनी चे मुख्य कार्यकारी अधिकारी कौस्तुभ धोंडे व सेल्स मॅनेजर अभिषेक शिंदे हे उपस्थित होते.
सन.२०३० पर्यंत रस्त्यावरील एकूण वाहनांच्या संख्येमध्ये २० ते ३० टक्के वाहने ही विजेवर चालणारी असावीत, असे शासनाचे धोरण आहे. त्या अनुषंगाने इ-वाहनांना टोल माफी व खरेदीवर थेट अनुदान देण्याची योजना शासनाने आखली आहे. याचा फायदा इ-ट्रॅक्टर खरेदी करणाऱ्या शेतकऱ्यांना होणार आहे .तसेच स्वर्गीय अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून बिनव्याजी कर्ज देखील इ-ट्रॅक्टर खरेदी साठी त्यांना उपलब्ध होऊ शकते. या बरोबरच इतर डिझेल ट्रॅक्टरच्या तुलनेमध्ये इ-ट्रॅक्टरचा देखभाल आणि दुरुस्तीचा खर्च जवळ जवळ शून्य आहे. तसेच वापर करताना लागणाऱ्या वीजेचा खर्च डिझेल इंधनाच्या तुलनेत ६० ते ७० टक्के ने कमी होणार आहे. त्यामुळे भविष्यात इ-ट्रॅक्टर शेतकऱ्यांचा ” किमयागार ” ठरणार आहे. नवीकरणीय तंत्रज्ञानावर आधारित
ऑटोनेक्स्ट या कंपनीने भारतातील पहिला स्वदेशी निर्मित इ - ट्रॅक्टर यशस्वीपणे बाजारात आणला आहे. आज या ट्रॅक्टरचे पहिले अधिकृत वाहन नोंदणी सोहळा ठाणे येथील प्रादेशिक परिवहन कार्यालयात (RTO) पार पडला.
१.५ लाखांपर्यंत अनुदान : ऑटोनेक्स्ट कंपनीचा इ- ट्रॅक्टर खरेदीवर महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रिक वाहन धोरण २०२५ अंतर्गत १.५ लाख रुपयांपर्यंतच्या अनुदान मिळणार आहे.
१ एकर नांगरणी साठी केवळ ३०० रुपये खर्च : इ-ट्रॅक्टर हा प्रामुख्याने शेतीतील कामासाठी वापरला जाणार आहे.१ एकर नांगरणी करण्यासाठी इ- ट्रॅक्टरला केवळ ३०० रुपये खर्च येतो. या उलट डिझेल ट्रॅक्टर ला हाच खर्च १२०० ते १५०० रुपयांपर्यंत जातो. त्यामुळे दुरुस्तीने देखभाल खर्चातील बचती बरोबरच दैनंदिन वापरामध्ये देखील इ-ट्रॅक्टर शेतकऱ्यांची पैशाची मोठी बचत करू शकतो.