ठाणे महापालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच सात नगरसेवक बिनविरोध निवडून आले. यामध्ये ७ लाडक्या बहिणींचा समावेश आहे. महायुतीच्या विजयाचा श्रीगणेशा झाला असून विजयाची सुरुवात ठाण्याने केली आहे. त्यामुळे येत्या १५ जानेवारीला ठाणे महापालिकेवर महायुतीचा झेंडा फडकणार यात कुठलीही शंका नाही, असे वक्तव्य उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे.
ठाणे महापलिका निवडणुकीच्या अर्ज माघारीच्या दिवशी शिंदे गटाचे ७ उमेदवार बिनविरोध निवडून आले. ठाणे महानगरपालिकेतील बिनविरोध उमेदवार
१) सुखदा मोरे
२) जयश्री फाटक
३) जयश्री डेव्हिड
४) सुलेखा चव्हाण
५) शीतल ढमाले
६) एकता भोईर
७) राम रेपाळे
या उमेदवारांचे अभिनंदन करताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. उद्धव ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना एकनाथ शिंदे यांचा उल्लेख सूर्याजी पिसाळ असा करीत दोन गुजरात्यांच्या हाती मुंबई द्यायची नाही असे वक्तव्य केले होते.
उद्धव ठाकरे यांच्या या वक्तव्याला शिंदे यांनी प्रतिउत्तर दिले आहे. निवडणुका आल्या की यांना मराठी माणूस आणि मुंबई आठवते. भावनिक राजकारण करण्यापेक्षा विकासाचे राजकारण करा, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुंबईसह महाराष्ट्राला विकास कामांसाठी १० लाख कोटी रुपये निधी दिला. मुंबई मोठी झाली तर, राष्ट्र मोठे होईल असे सांगत, केंद्राने मुंबईच्या विकासाला चालना दिली. परंतु, उद्धव ठाकरे यांनी मुंबईसाठी काय केले? असे एक तरी ठोस काम सांगावे असा टोला एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला. उद्धव ठाकरे यांच्यामुळे मुंबईतील मराठी माणूस मुंबई बाहेर फेकला गेला. त्याला मुंबईत परत आणण्याचे काम आम्ही करत असल्याचे देखील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी सांगितले. तसेच उद्या मुंबईत महायुतीची पहिली सभा पार पडणार असून तेथूनच महायुतीच्या प्रचाराचा नारळ फुटणार असल्याचे एकनाथ शिंदे म्हणाले.
ठाण्यात महायुतीचे शंभरहून अधिक नगरसेवक
ठाणे महापालिका निवडणूकीत शिवसेना -भाजप युतीचे शंभरहून अधिक नगरसेवक निवडूण येतील असा विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला आहे. ठाणे हा महायुतीचा बालेकिल्ला आहे. ठाणेकर आणि शिवसेना हे समीकरण गेल्या अनेक वर्षांपासून आहे. त्यामुळे ठाण्यात शिवसेना – भाजप युतीला बहुमत मिळणार असेही ते म्हणाले.
बिनविरोध नगरसेवकांची संख्या मोठी
बिनविरोध नगरसेवकांची संख्या मोठी आहे. काही लोक म्हणतात बिनविरोध हा काय नवीन प्रकार आहे. परंतु, ज्या ठिकाणी विरोधी पक्षातील नेत्यांना विश्वास असतो, खात्री असते की, महायुतीचा उमेदवार कामाच्या जोरावर याठिकाणी निवडून येणार तेथे इतर पक्षाचे लोक माघार घेतात. त्यामुळे आमच्या उमेदवारांच्या कामाची पोस्ट पावती अशा प्रकारच्या बिनविरोध येण्याने सिद्ध होते, असे शिंदे म्हणाले.