रस्ता सुरक्षा अभियानात “कार्निव्हल”च्या उद्घाटन प्रसंगी उपमुख्यमंत्री शिंदे यांची ग्वाही…
ठाण्यातील वाहतूक कोंडी कशी दूर होईल याला प्राधान्य देण्यात येत असुन कोस्टल रोड तसेच उन्नत मार्गाचे काम प्रगतीपथावर आहे. त्यामुळे, लवकरच ठाणेकरांना वाहतुक कोंडी मुक्त प्रवास करण्याचा अनुभव येईल. असे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. प्रजासत्ताक दिनी रस्ता सुरक्षा अभियानाच्या “कार्निव्हल” चे उद्घाटन उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते.
ठाणे शहर वाहतुक शाखेच्यावतीने रस्ता सुरक्षा अभियान – २०२६ राबविण्यात येत आहे. या अभियानाच्या अनुषंगाने साकेत येथील पोलीस क्रिडासंकुल मैदानात प्रजासत्ताक (ता.२६ जाने.) दिनापासुन २८ जाने.पर्यंत सुरू असलेल्या वाहतुक नियमांविषयी जनजागृतीपर विविध कार्यक्रमांच्या कार्निव्हलचे उद्घाटन सोमवारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पार पडले. यावेळी आमदार संजय केळकर, रविंद्र फाटक, जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे, ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी रणजीत यादव, पोलीस सह आयुक्त डॉ. ज्ञानेश्वर चव्हाण, पोलीस अधीक्षक डॉ. डी.एस. स्वामी, वाहतुक पोलीस उप आयुक्त पंकज शिरसाट आणि स्टॅडअप कॉमेडीयन नविन प्रभाकर आदींसह अनेक अधिकारी व मान्यवर उपस्थित होते. ह्या कार्निव्हलमध्ये विद्यार्थ्यांनी रेखाटलेल्या वाहतुकीच्या चित्ररूपी दिनदर्शिकेचे लोकार्पण करून उपमुख्यमंत्री शिंदे यांनी विद्यार्थ्याचे सत्कार केले. दरवर्षी रस्ता सुरक्षा अभियान राबविण्यात येते, त्याप्रमाणें प्रत्येकाने वाहतुकीच्या नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. वाहतूक नियमांची जनजागृती लहानग्यापासून केली जात आहे, याचा अभिमान वाटत असल्याचे गौरवोद्गार काढत ना. शिंदे यांनी, कार्निव्हलच्या प्रदर्शनात मांडलेल्या ई दुचाकी तसेच, ई मोटारी चालवण्याची अनुभुती घेतली. कार्यक्रमात उपस्थितांना संबोधित करताना शिंदे यांनी, वाहनचालकांसह पादचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी “रस्ता सुरक्षा हीच जीवन सुरक्षा” हे अधोरेखित करताना शहरातील रस्त्यांबरोबरच पदपथ राखण्यासाठी विशेष मोहीम हाती घेण्याचे निर्देश दिले. पदपथ नागरीकांना चालण्यासाठी आहेत, ते अबाधित ठेवले पाहिजेत. त्यामुळे पादचाऱ्यांचे अपघात कमी होण्यास मदत होईल.या अनुषंगाने, महापालिका, पोलीस आणि जिल्हाधिकारी यांनी समन्वयाने काम करण्याची अपेक्षा व्यक्त केली.
कोस्टल रोड, उन्नत मार्गाचे कामही प्रगतीपथावर
सर्वांनी नियम पाळले तर, अपघात होणारच नाहीत, ड्रंक एंड ड्राइव्हची मोहिम अधिक तीव्र केल्यामूळे देखील अपघात कमी झाल्याकडे त्यांनी लक्ष वेधले. दरम्यान, ठाण्याची वाहतूक कोंडी कशी दूर होईल यासाठी प्राधान्य देण्याचे सुतोवाच करून ना. शिंदे यांनी घोडबंदर रोड पूर्ण खड्डेमुक्त करणार असल्याचे सांगितले. या सत्यावर अनेक ठिकाणी थोडे कट आपण बंद केल्याने वाहतूक कोंडी कमी झाली. त्याचबरोबर कोस्टल रोड, उन्नत मार्गाचे कामही प्रगतीपथावर आहे, त्यामुळे लवकरच ठाणेकरांना कोंडी मुक्त प्रवास करण्याचा अनुभव येईल. अशी ग्वाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणेकरांना दिली.