
ठाणे, ता.२३ (प्रतिनिधी) महाराष्ट्राचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज तसेच स्वराज्य रक्षक धर्मवीर संभाजी महाराजांच्या पराक्रमाची आणि स्वराज्याच्या तेजस्वी इतिहासाचे आकलन करून देणारे ‘स्वराज्याचे आख्यान’ रविवारी ठाण्यात उत्साहात पार पडले. धर्मवीर श्री आनंद दिघे प्रतिष्ठानच्या वतीने कोपरीत आयोजित श्री अंबे मॉ चैत्र नवरात्रौत्सवामध्ये उपस्थित भाविकांना पराक्रम, त्याग आणि स्वाभिमानाची अनुभूती लाभली. या प्रसंगी अभिनेते सिद्धार्थ बोडके यांची प्रमुख उपस्थिती होती. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढाकाराने धर्मवीर श्री आनंद दिघे प्रतिष्ठानच्या वतीने ठाणे पूर्वेतील कोपरी येथील संत तुकाराम महाराज मैदानात चैत्र नवरात्रोत्सवानिमित्त सहस्त्रचंडी हवनात्मक नवकुंडीय महायज्ञ सुरू आहे. या धार्मिक सोहळ्यात दररोज शेकडो भाविक दर्शन व भंडाऱ्याचा लाभ घेत आहेत. उत्सवादरम्यान देवीचा मंगलाभिषेक, सप्तशती पाठ, सामूहिक राजोपचार पूजन, अर्चना, मध्यान्ह आरती आणि सांज आरती अशा विविध धार्मिक उपक्रमांसोबतच दररोज सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जात आहेत. रविवारी सायंकाळी पार पडलेल्या ‘स्वराज्याचे आख्यान’ ची सुरुवात गण सादरीकरणाने झाली. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांना वंदन करून आख्यानाला प्रारंभ झाला. शिवकालीन कवी भूषण यांची महती विषद केल्यानंतर ‘पोतराज आलाय भेटीला’ सारख्या पारंपरिक सादरीकरणांनी वातावरण शिवमय होऊन गेले. कार्यक्रमात स्वराज्याच्या इतिहासातील अनेक पराक्रमी व्यक्तिमत्त्वांच्या प्रेरणादायी कथा उलगडण्यात आल्या. हिरोजी फर्जंद, हिरोजी इंदलकर, हिरकणी, सरनोबत हंबीरराव मोहिते, संताजी घोरपडे, बहिर्जी नाईक, धनाजी जाधव यांसारख्या शूरवीरांच्या पराक्रमाला यावेळी उजाळा देण्यात आला. तसेच, छत्रपती संभाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचा प्रसंगही थरारक पद्धतीने उभा करण्यात आला. यावेळी सभागृहात छत्रपतींचा जयजयकार झाला. देवी मातेचा गोंधळ, शाहिरी पिंगळा, गवळण आणि ओवी यांसारख्या लोकपरंपरांनी आख्यानाला सांस्कृतिक रंगत चढली. यावेळी १२ स्वरचित व नविन गीतांचे सादरीकरण झाले. शाहिर मल्हार बेलोसे, गणेश बागूल आणि आशुतोष सूर्यवंशी यांनी आपल्या कलागुणांनी प्रेक्षकांची मने जिंकली. अभिजीत गायकवाड यांनी मुख्य सूत्रधार म्हणून ‘स्वराज्याचे आख्यान’ कार्यक्रमात प्रभावी भूमिका बजावली. त्यांच्या दमदार खर्जातील निवेदनाने जणु इतिहास जिवंत झाला. यावेळी त्यांनी चिमुकल्या मावळ्यांना व्यासपीठाजवळ बोलावून छत्रपतींच्या विचारांचे पालन करण्याची शपथ दिली. कार्यक्रमाचा समारोप महाराष्ट्र राज्य गीताने झाला. या प्रसंगी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सौ. लता एकनाथ शिंदे, अभिनेते सिद्धार्थ बोडके, अभिनेते मंगेश देसाई, अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी, माजी महापौर मिनाक्षी शिंदे, शिवसेना सचिव संजय मोरे, जयप्रकाश कोटवानी, प्रमोद बनसोडे, राहुल लोंढे, किरण नाकती यांच्यासह अनेक शिवसेना नगरसेवक, पदाधिकारी आणि भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. *स्वराज्याच्या आख्यानातुन देशभक्तीची भावना दृढ* चैत्र नवरात्रौत्सवात या सारख्या उपक्रमांमुळे नव्या पिढीला स्वराज्याचा इतिहास आणि छत्रपतींचे विचार समजण्यास मदत झाली.”स्वराज्याचे आख्यान’ ऐकुन समाजात देशभक्तीची भावना अधिक दृढ होत आहे, अशी प्रांजळ कबुली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सौभाग्यवती सौ.लता वहिनीनी दिली. तर, असे कुटुंब आणि सहकारी सोबतीला असल्याने भविष्यात एकनाथ शिंदे भारताचे पंतप्रधान बनतील. असे भाकित अभिनेता सिद्धार्थ बोडके यांनी वर्तवले…..