
कोकणनगर गोविंदा पथकाने १० थर रचून केला विश्वविक्रम, गिनिज बुक वर्ल्ड रेकॉर्ड प्रमाणपत्राने सन्मानित
संस्कृती युवा प्रतिष्ठान आयोजित ठाण्यातील ऐतिहासिक दहीहंडी सोहळ्याने पुन्हा एकदा महाराष्ट्राचे नाव जागतिक पातळीवर गौरवले आहे. तब्बल १३ वर्षांपूर्वी म्हणजेच १० ऑगस्ट २०१२ रोजी संस्कृती युवा प्रतिष्ठानच्या दहीहंडी सोहळ्याने गिनीज वर्ल्ड रेकॉर्डची नोंद केली होती आणि आता पुन्हा एकदा, कोकण नगर गोविंदा पथकाने १० थरांचा मानवी मनोरा यशस्वीरीत्या रचत जागतिक विक्रम प्रस्थापित केला आहे. श्री सिद्धिविनायकाच्या साक्षीने या अभूतपूर्व कामगिरीची दखल घेत गिनीज वर्ल्ड रेकॉर्डचे वरिष्ठ अधिकारी (Senior Adjudicator) श्री. स्वप्निल डांगरकर यांनी आज याचे अधिकृत प्रमाणपत्र सुपूर्द केले. हा सोहळा प्रभादेवी येथील सिद्धिविनायक मंदिरात मोठ्या उत्साहात पार पडला. सध्या गणेशोत्सव सुरू असून, या यशामागे श्री सिद्धिविनायकाचे आशीर्वाद आहे. म्हणून या विश्वविक्रमाला गवसणी घालता आली आहे. त्यामुळे सिद्धीविनायकाचे आभार मानून पुन्हा नव्या खेळासाठी बळ दे यासाठीच हा सोहळा बाप्पाच्या मंदिरात आयोजित करण्यात आला. या प्रसंगी महाराष्ट्र राज्य दहीहंडी गोविंदा असोसिएशनचे विशेष आभार मानण्यात आले, कारण त्यांच्या सातत्यपूर्ण पाठबळामुळे व मार्गदर्शनामुळे हा विक्रम शक्य झाला. कोकण नगर गोविंदा पथक हे दहा थरांचा विक्रम अधिकृतपणे गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदविणारे पहिलेच पथक ठरले आहे. त्यांच्या या ऐतिहासिक यशामुळे महाराष्ट्राच्या परंपरेला जागतिक पातळीवर मान्यता मिळाली आहे. कोकण नगर पथकाची मेहनत, शिस्तबद्ध सराव आणि जोखीम पत्करण्याची तयारी हेच त्यांच्या विक्रमामागील मोठे यश आहे. महाराष्ट्र राज्य दहीहंडी गोविंदा असोसिएशन आणि गोविंदा पथकाने आणि मान्यवरांनी मा. परिवहन मंत्री श्री. प्रताप सरनाईक व युवासेना कार्याध्यक्ष श्री. पुर्वेश सरनाईक यांच्या अथक परिश्रमांचे कौतुक केले. त्यांच्या दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वामुळे व अथक प्रयत्नांमुळे ठाण्यातील दहीहंडी सोहळा आज जागतिक कीर्तीला पोहोचला आहे. यावेळी युवासेना कार्याध्यक्ष पुर्वेश सरनाईक म्हणाले, “दहीहंडी ही केवळ परंपरा नसून महाराष्ट्राच्या सांस्कृतिक अस्मितेचे प्रतीक आहे. आज या विक्रमामुळे महाराष्ट्राचे नाव जगभर दुमदुमले असून ही आपल्या संपूर्ण गोविंदांची ऐतिहासिक कामगिरी आहे. आणि या सर्व यशामागे श्री सिद्धिविनायकाचे आशीर्वाद आहेत.”