
खडतर परिस्थितीवर मात करून आंतरराष्ट्रीय स्तरावर बेसबॉलमध्ये भारताचे नेतृत्व करणाऱ्या शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार विजेत्या बारामतीच्या रेश्मा पुणेकर यांनी रविवारी ठाण्यातील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारकाला भेट देत अहिल्यादेवींना अभिवादन केले. रेश्मा पुणेकर या काही कामानिमित्त ठाण्यात आल्या होत्या, यावेळी त्यांनी जांभळी नाका, मासुंदा तलाव परिसरातील अहिल्यादेवींच्या पुतळ्याला पुष्प अर्पण करून कृतज्ञता व्यक्त केली. यावेळी धनगर प्रतिष्ठानच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. ह्या कार्यक्रमाला युवा उद्योजक संदेश कवितके, प्राध्यापक संतोष तांबे, धनगर प्रतिष्ठानचे अध्यक्ष दीपक कुरकुंडे, कार्याध्यक्ष महेश गुंड, सल्लागार मनोहर विरकर, सूर्यकांत रायकर, सुरेश भांड, गणेश बारगीर, राजेश वारे, संतोष दगडे, सौदागर खरात, प्रशांत कुरकुंडे, सुनील पळसे आदी मान्यवर उपस्थित होते. बारामतीतील एका साध्या मेंढपाळ कुटुंबात जन्मलेल्या रेश्मा पुणेकर यांचा प्रवास हा संघर्षमय आणि प्रेरणादायी आहे. बालपणी मेंढ्यांची राखण करताना साध्या काठीने खेळता खेळता बेसबॉलची आवड जोपासली. आर्थिक अडचणी आणि सामाजिक बंधनांवर मात करून त्यांनी कठोर परिश्रमाच्या जोरावर भारतीय संघाचे कर्णधारपद मिळवले.आजवर त्यांनी २ आंतरराष्ट्रीय सामने (चीन आणि हाँगकाँग), २३ राष्ट्रीय सामने, २८ राज्यस्तरीय सामने खेळले असून ७ सुवर्ण, ८ रौप्य, ६ कांस्य पदकांसह शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार मिळवला आहे. चीनमध्ये झालेल्या सामन्यात तब्बल २६५ चेंडू टाकणारी देशातील पहिली महिला खेळाडू म्हणून त्यांचे नाव इतिहासात कोरले गेले आहे. रेश्मा यांनी हाँगकाँगमधील आशियाई महिला कप २०२३ मध्ये भारतीय संघाचे नेतृत्व केले असून, आता त्या आगामी ऑलिम्पिकमध्ये भारतीय संघाचे कर्णधारपद सांभाळणार आहेत. त्यांच्या या प्रवासाला बळ देण्याचे काम करणारे युवा उद्योजक संदेश कवितके यांचे तिने मनःपूर्वक आभार मानले.