फिट इंडिया संडेज ऑन सायकल उपक्रमाच्या पंढरपूर आवृत्ती 2025 मध्ये 5000 हून अधिक सायकलस्वारांचा सहभाग; सहभागींनी 7 दिवसांहून अधिक काळ सायकलिंग करत 10 लाख किलोमीटरहून अधिक प्रवास करून भारतातील आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या सायकलिंग मेळाव्याचा विक्रम केला प्रस्थापित

आध्यात्मिक भक्ती, शारीरिक तंदुरुस्ती आणि पर्यावरण जागरूकतेचा अनोखा संगम घडवणारी चौथी अखिल महाराष्ट्र पंढरपूर सायकल वारी संमेलन – 2025 मोठ्या उत्साहात आणि एकतेच्या वातावरणात साजरी करण्यात आली. फिट इंडिया संडेज ऑन सायकल हा भव्य कार्यक्रम भारतीय क्रीडा प्राधिकरण, प्रादेशिक केंद्र – मुंबई आणि पंढरपूर सायकल वारी संघ यांनी संयुक्तरित्या आयोजित केला होता.
या उपक्रमात महाराष्ट्र, कर्नाटक, मध्य प्रदेशातील 90 हून अधिक सायकलिंग क्लबचे प्रतिनिधित्व करणारे 5000 हून अधिक सायकलस्वार सहभागी झाले होते. या सायकलस्वारांनी महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यातील पावन तिर्थक्षेत्र पंढरपूर येथे पोहोचण्यासाठी 3-4 दिवस आधीच 400 ते 450 किलोमीटरचा प्रवास केला. या सायकलस्वारांनी आध्यात्मिकदृष्ट्या महत्त्वपूर्ण असलेल्या नगर प्रदक्षिणा आणि उत्साही रिंगण सोहळ्यात सक्रिय सहभाग घेतला. याप्रसंगी त्यांनी अभूतपूर्व दृढनिश्चय, भक्ती आणि सहनशक्तीचे दर्शन घडवले.

भारत सरकारच्या केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाच्या राज्यमंत्री रक्षा खडसे, महाराष्ट्र सरकारच्या ग्रामीण विकास आणि पंचायती राज विभाग मंत्री जे. बी. गोरे यांच्यासारख्या अनेक मान्यवरांच्या सन्माननीय उपस्थितीत हा कार्यक्रम साजरा करण्यात आला. यांच्याशिवाय या कार्यक्रमात खासदार धैर्यशील मोहिते पाटील, विधान परिषदेचे सदस्य प्रशांत परिचारक, विधान परिषदेचे सदस्य रणजितसिंह मोहिते पाटील, भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या मुंबई येथील प्रादेशिक केंद्राचे प्रादेशिक संचालक (आयआरएस) पांडुरंग चाटे आणि नागपूर येथील प्रसिद्ध सहनशक्ती सायकलपटू तसेच 19 वेळा आयर्नमॅन किताब पटकावणारे डॉ. अमित समर्थ यांचा समावेश होता.