ठाण्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या रॅलीला अभूतपूर्व प्रतिसाद
ठाणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रचार दौर्याला नागरिकांकडून अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. शहरातील प्रमुख मार्गांवर रस्त्याच्या दुतर्फा मोठ्या संख्येने नागरिकांची गर्दी उसळली होती. भगवे झेंडे आणि घोषणांनी संपूर्ण परिसर भगवामय झाला होता. यावेळी महानगरपालिका निवडणुकीत महायुतीच्या उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजयी करण्याचे आवाहन ठाणेकरांना केले.
रॅलीदरम्यान उपमुख्यमंत्री शिंदे यांनी बाईकवरूनही सहभाग घेतला. याप्रसंगी लाडक्या बहिणी देखील या बाईक रॅलीमध्ये बाईकवर स्वार झाल्या होत्या. उपमुख्यमंत्री शिंदे हे जागोजागी थांबून नागरिकांचे अभिवादन स्वीकारत होते. महिलांपासून युवकांपर्यंत, ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्व स्तरांतून त्यांचे उत्स्फूर्त स्वागत झाले. ढोल-ताशांच्या गजरात, “शिवसेना… शिवसेना” आणि “ठाणे महापालेकर भगवा फडकवा” अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला.
यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, ठाणे शहराच्या सर्वांगीण विकासासाठी शिवसेना कटिबद्ध आहे. पायाभूत सुविधा, रस्ते, पाणीपुरवठा, वाहतूक व्यवस्था, आरोग्य व शिक्षण या सर्व क्षेत्रात ठोस कामे करण्यात आली असून पुढील काळातही विकासाची गती अधिक वाढवली जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले.
ठाणेकरांनी आगामी ठाणे महानगरपालिका निवडणुकीत महायुतीच्या सर्व उमेदवारांना भरघोस मते देऊन पालिकेवर पुन्हा भगवा फडकवावा, असे आवाहन करत त्यांनी नागरिकांना एकजुटीने शिवसेनेच्या पाठीशी उभे राहण्याचे आवाहन केले. शहराचा विकास, सुरक्षितता आणि सुशासनासाठी शिवसेनाच सक्षम पर्याय असल्याचे त्यांनी ठामपणे नमूद केले.
या रॅलीने ठाणे महापालिका निवडणुकीत शिवसेनेची ताकद आणि कार्यकर्त्यांचा उत्साह पुन्हा एकदा अधोरेखित झाला असून, येत्या निवडणूक लढतीसाठी वातावरण तापले असल्याचे चित्र दिसून आले.
यावेळी खासदार नरेश म्हस्के, आमदार संजय केळकर, आमदार निरंजन डावखरे, माजी आमदार रवींद्र फाटक, भाजप प्रदेश सरचिटणीस संदीप लेले, ठाणे विधानसभा प्रमुख हेमंत पवार आणि शिवसेना- भाजप – आरपीआय महायुतीचे सर्व स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
….