Skip to content
January 21, 2026
  • Facebook
  • YouTube
  • Instagram
  • Tweeter
  • Whats App.

S9 TV NEWS

` S9 News
Primary Menu
  • HOME
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • देश-विदेश
  • क्रीडा
Live
  • Home
  • मनोरंजन
  • निर्मिती सावंत – प्रार्थना बेहेरे झळकणार सासू – सुनेच्या भूमिकेत…

निर्मिती सावंत – प्रार्थना बेहेरे झळकणार सासू – सुनेच्या भूमिकेत…

S9 TV NEWS December 17, 2025
IMG-20251217-WA0038.jpg
Like, Follow, Subscribe

अगं अगं सूनबाई! काय म्हणताय सासूबाई?’ चा टीझर करतोय धमाल !

झी स्टुडिओज आणि सनफ्लॉवर स्टुडिओजचा बहुचर्चित मराठी चित्रपट ‘अगं अगं सूनबाई! काय म्हणताय सासूबाई?’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेल्या पोस्टरने या चित्रपटाबद्दल प्रचंड उत्सुकता निर्माण केली होती. पाठमोऱ्या दिसणाऱ्या सासू-सुनेच्या जोडीने प्रेक्षकांच्या मनात एकच प्रश्न निर्माण केला होता, तो म्हणजे ही जोडी नेमकी कोणाची? आणि आता या प्रश्नाचं उत्तर देत, मनोरंजनाची पूर्ण तयारी करत चित्रपटाचा धमाल टीझर प्रदर्शित झाला आहे. नुकत्याच या चित्रपटाच्या टिमने मुंबईतील महालक्ष्मीच्या मंदिरात जाऊन देवीचे आशीर्वाद घेत, चित्रपटाच्या टिझरचे आणि पोस्टरचे अनावरण केले. या चित्रपटाच्या निमित्ताने प्रार्थना बेहरे आणि निर्मिती सावंत पहिल्यांदाच एकत्र पडद्यावर झळकणार असून, सासू-सुनेची एक हटके, ताकदवान आणि तितकीच खमंग जोडी प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे . टीझरमध्येच दोघींची जुगलबंदी, टोमणे, मिश्किल संवाद आणि भावनिक क्षण यांचा सुरेख मेळ पाहायला मिळतोय. प्रार्थना बेहरे आधुनिक, आत्मविश्वासू आणि स्पष्टवक्ती सून म्हणून दिसत आहे, तर निर्मिती सावंत पारंपरिक, ठाम मतांच्या आणि अनुभवसंपन्न सासूबाईंच्या भूमिकेत लक्ष वेधून घेत आहेत. दोन पिढ्या, दोन विचारधारा आणि दोन कणखर स्त्रिया यांच्यातील नात्याचं गोड–तिखट, हलकंफुलकं तरीही अर्थपूर्ण चित्रण या चित्रपटाचं प्रमुख वैशिष्ट्य ठरणार आहे. समाजात नेहमी म्हटलं जातं की, ”प्रत्येक पुरुषाच्या मागे एक स्त्री असते”, परंतु एका स्त्रीच्या मागे दुसरी स्त्री ठामपणे उभी राहिली तर, ती नाती किती बळकट होऊ शकतात, हाच विचार हा चित्रपट अतिशय सहज आणि प्रभावीपणे मांडतो. दिग्दर्शक केदार शिंदे म्हणतात, ” ही कथा आजच्या काळातील सासू–सुनेच्या नात्याची आहे. दोघीही स्वतंत्र विचारांच्या आहेत, स्वतःच्या मतांवर ठाम आहेत. त्यामुळे मतभेद होतात, नोकझोक होते, परंतु त्याचबरोबर दोघींच्या समजूतदारपणाची आणि त्यांच्या तरल नात्याची सुंदर कहाणी यात आहे. सासू आणि सून एकमेकींच्या आयुष्यात आधार बनू शकतात, ही भावना या चित्रपटाचा गाभा आहे.” झी स्टुडिओजचे व्यवसाय प्रमुख बवेश जानवलेकर म्हणतात, ”प्रेक्षकांना केवळ मनोरंजन नव्हे, तर विचार करायला लावणारा आशय देण्यावर आमचा भर असतो. ‘अगं अगं सूनबाई! काय म्हणताय सासूबाई?’ हा चित्रपट हसवेलही आणि नात्यांकडे पाहाण्याचा एक वेगळा दृष्टिकोनही देईल.” झी स्टुडिओजचे उमेश कुमार बन्सल म्हणतात, ”आज स्त्रियांचं नातं केवळ संघर्षाचं नाही, तर एकमेकांना आधार देणारंही आहे. एका स्त्रीच्या पाठीशी दुसरी स्त्री उभी राहिल्यास कायबदल घडू शकतो, हे आम्ही या कथेतून दाखवण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे.” कधी हसवणारी तर कधी मनाला भिडणारी आणि आजच्या काळातील सासू सुनेच्या नात्यातील बंध उलगडणारी ही कथा, दोन पिढ्यातील स्त्रियांच्या नातेसंबंधाचं सामर्थ्य अधोरेखित करते. टीझर पाहून एक गोष्ट मात्र नक्की, ‘अगं अगं सूनबाई! काय म्हणताय सासूबाई?’ हा चित्रपट सासू–सुनेच्या नात्याची एक नवी, ताजीतवानी आणि विचारप्रवर्तक ओळख देणारा आहे. झी स्टुडिओज व सनफ्लॉवर स्टुडियोज निर्मित ‘अगं अगं सूनबाई !काय म्हणताय सासूबाई?’ चित्रपटाचे दिग्दर्शन केदार शिंदे यांनी केले असून सना शिंदे, उमेश कुमार बन्सल यांची निर्मिती आहे. चित्रपटाची कथा आणि संवाद वैशाली नाईक व ओमकार मंगेश दत्त यांची असून पटकथा वैशाली नाईक यांची आहे. तसेच चित्रपटाचे छायाचित्रण व संकलन मयूर हरदास यांनी केले आहे. येत्या १६ जानेवारी पासून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

Continue Reading

Previous: अद्वैत कचराजच्या ८८ धावासह ५ बळी
Next: अजय जेया फाउंडेशन ठेवणार निवडणूक प्रक्रियेवर नजर..
  • FwZLKEnacAA0XiF
  • img-20250602-wa00015808276882074419283.jpg
  • 473241588_9184857851597815_2764842180287072871_n
  • Facebook
  • YouTube
  • Instagram
  • Tweeter
  • Whats App.
"Copyright © 2025 | S9 TV News | MoreNews by AF themes.
Share

Facebook

X

LinkedIn

WhatsApp

Copy Link
×