
हैदराबाद गॅझेट लागू करून त्याचे लाभ मराठा समाजाला मिळवून देणार
सरकारचा अध्यादेश कोर्टाच्या कसोटीवर टिकणार
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं मराठा समाजाचे अभिनंदन
मनोज जरांगे पाटील यांनी पाच दिवस केलेल्या उपोषणावेळी सरकारने कायम सकारात्मक भूमिका घेतली. त्यामुळेच मराठा समाजाला अपेक्षित असलेले निर्णय घेऊन त्यांना दिलासा मिळवून दिला असल्याचे मत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले. मराठा समाजाला न्याय देण्यासाठी आम्ही राधाकृष्ण
विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखालील समिती गठित केली होती. त्या कमिटीने केलेल्या कामाच्या बळावरच मराठा समाजाला न्याय देणे शक्य झाले असल्याने या कमिटीतील सर्वांचे शिंदे यांनी अभिनंदन केले. मराठा समाजाला दिलासा देताना याबाबत सर्वंकष चर्चा करूनच हा निर्णय घेतला आहे. हैदराबाद गॅझेट तातडीने लागू करून सातारा गॅझेटची अंमलबजावणी करण्याबाबत सरकार सकारात्मक आहे. तसेच मराठा आंदोलना दरम्यान ज्यांचा मृत्यू झाला त्याना १० लाख आणि नोकरी देण्याबाबत मी मुख्यमंत्री असताना निर्णय घेतला होता. त्यातील उर्वरित प्रलंबित प्रकरणे आता निकाली काढण्यात येतील असेही शिंदे यांनी स्पष्ट केले. माझ्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात गठित करण्यात आलेल्या शिंदे समितीने ५८ लाख नोंदी शोधल्या असून त्यातून १० लाख मराठा बांधवांना कुणबी प्रमाणपत्र देण्यात आले आहेत. त्यासोबतच एसइबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला १० टक्के आरक्षण देण्याचा घेतलेला निर्णय देखील आम्ही हायकोर्टात टिकवला आहे. हे आरक्षण देतानाही जस्टिस शुक्रे यांच्या अध्यक्षतेखाली मागासवर्ग आयोगाची स्थापना करून २ कोटी ४७ लाख घरांचे सर्वेक्षण करून ५८ लाख लोकांचा सर्वे करून मराठा समाजाचे आर्थिक आणि सामाजिक मागासलेपण सिद्ध करून त्यानंतर त्यांना १० टक्के आरक्षण दिल्याने ते नक्की टिकेल असा विश्वास शिंदे यांनी व्यक्त केला.
सरकारने काढलेला जीआर कायद्याच्या कसोटीवर टिकणारच
राज्य शासनाने आज काढलेला जीआर आहे तो कायद्याच्या कसोटीवर नक्की टिकेल असा विश्वास शिंदे यांनी व्यक्त केला. हा जीआर काढताना कायदेशीर बाबींच्या पूर्ण अभ्यास करून तो काढण्यात आलेला आहे. या जीआरच्या माध्यमातून इतर समाजाचे काहीही हिरावून न घेता मराठा समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. या माध्यमातून स्थानिक पातळीवर नाहानिशा करून अत्यंत सुलभतेने कुणबी प्रमाणपत्र काढता येणार आहे. त्यामुळे त्यावर आक्षेप घेऊन कुणी न्यायालयाचा दरवाजा ठोठावला तरीही कायद्याच्या कसोटीवर हा जीआर नक्की टिकेल असा विश्वास शिंदे यांनी व्यक्त केला.
मराठा आंदोलनामुळे सरकारला कोंडीत पकडणे विरोधकांना जमले नाही
या प्रकरणी विरोधी पक्षाने सरकारला अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला ते त्यांचे कामच असते. पण मी देवेंद्रजी आणि अजित दादा एकत्रितपणे ही परिस्थिती हाताळली त्यामुळे त्यांना हवे ते या आंदोलनातून त्यांना साध्य करता आले नाही. जरांगे पाटील यांच्या आंदोनाबाबत आम्ही सरकारात्मक होतो त्यामुळेच त्यांना आणि पर्यायाने मराठा समाजाला दिलासा देणारा निर्णय आम्ही देऊ शकलो असल्याचे मत शिंदे यांनी यावेळी बोलताना व्यक्त केले..