
आरक्षणाच्या मागणीसाठी हजारो समाजबांधव एकत्र
जय सेवालाल, जय बंजारा समाजाचा गजर करीत ठाणे जिल्ह्यातील हजारो बंजारा समाजबांधवांनी एकत्र येऊन हैदराबाद गॅझेटियरनुसार अनुसूचित जमाती प्रवर्गात आरक्षण देण्याच्या मागणीसाठी एल्गार केला. बंजारा समाजाच्या महाआक्रोश मोर्चाने कोर्ट नाका परिसर दूमदूमून गेला होता. या मोर्चातील शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन निवेदन दिले. तसेच यापुढील काळातही बंजारा समाजाच्या हक्कासाठी संघर्ष करण्याचा निर्धार केला. बंजारा समाजाच्या वतीने राज्यभरात अनुसुचित जमाती म्हणून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी भव्य मोर्चे काढले जात आहेत. त्यानुसार ठाणे जिल्ह्यातील बंजारा आरक्षण समितीने समाजबांधवांना एकत्र करुन आज मोर्चा काढला. या मोर्चाचे नेतृत्व शंकर पवार, नंदूभाऊ पवार, राकेश चौगुले, भगवान तारासिंग आडे यांच्यासह जोरसिंग पवार, जगन राठोड, शिवा चव्हाण, रवी चव्हाण, रवी जाधव, सोमनाथ राठोड, लक्ष्मण चव्हाण, गोपाळ राठोड, रामेश्वर चव्हाण, राज राठोड, अभिराम राठोड, भिकन चव्हाण, हाना राठोड यांच्यासह प्रमुख कार्यकर्त्यांनी केले. ठाणे जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून बंजारा समाजातील कार्यकर्ते व समाजबांधव एकत्र आले होते. या मोर्चातर्फे कोर्टनाका येथे भव्य सभा घेण्यात आली. बंजारा समाजाला हैदराबाद गॅझेटनुसार अनुसूचित प्रवर्गातून आरक्षण द्यावे ही यांची मुख्य मागणी आहे. एक भाषा एक वेशभूषा आणि २२ प्रांतातील वास्तव्य ही वैशिष्ट्ये बंजारा समाजाची आहेत. त्यानुसार बंजारा समाजाला अनुसूचित प्रवर्गातून आरक्षण हक्काचे आहे, अशी भूमिका मोर्चेकऱ्यांकडून मांडण्यात आली. हैदराबाद राज्यामध्ये १९४८ पर्यंत मराठवाडा हा भाग होता. निजामशासित हैदराबाद राज्यातील हैदराबाद स्टेट गॅझेटियरमध्ये बंजारा, लंबाडा समाजाचा स्पष्ट उल्लेख अनुसूचित जमाती म्हणून करण्यात आलेला आहे. बंजारा समाज मोठ्या प्रमाणावर राज्यात पसरलेला आहे. गॅझेटमधील उताऱ्यात बंजारा समाजाबाबत स्पष्ट उल्लेख आहे. मात्र, महाराष्ट्रात मराठवाडा सामील झाल्यानंतर १९५६ मध्ये समाजाची ओबीसी-एनटी-सी प्रवर्गात समावेश करण्यात आला. तर तेलंगण व आंध्र प्रदेशात बंजारा समाजाला अनुसूचित जमातीचा दर्जा देण्यात आला आहे, याकडे मोर्चाच्या शिष्टमंडळातील शंकर पवार, नंदूभाऊ पवार, राकेश चौगुले आणि भगवान आडे यांनी लक्ष वेधले. महाराष्ट्र सरकारने मराठा समाजाला २ सप्टेंबर २०२५ च्या शासन निर्णयानुसार हैदराबाद गॅझेटियर लागू केले. त्याच धर्तीवर बंजारा (लमाण) समाजालाही गॅझेटियरमधील नोंदीनुसार महाराष्ट्रात अनुसूचित जमातीतून आरक्षण उपलब्ध करावे, अशी आग्रही मागणी भगवान आडे यांच्याकडून करण्यात आली. बंजारा समाजातील सांस्कृतिक, सामाजिक आणि आर्थिक स्वरुप हे अनुसूचित जमातींप्रमाणेच आहे, याकडे लक्ष वेधत राकेश चौगुले यांनी हैदराबाद गॅझेटियर नुसार बंजारा समाजाला आरक्षण उपलब्ध करावे, अशी मागणी केली. बंजारा समाजाला अनुसूचित जमातीमधून आरक्षण मिळणार नाही, तोपर्यंत हा लढा थांबणार नाही, असा निर्धार मोर्चातून व्यक्त करण्यात आला.