
लोकमान्यनगरवासींची वनखात्याने रोखलेली पायवाट मोकळी होणार
आमदार संजय केळकर यांची वनाविभागाशी चर्चा
ठाणे: लोकमान्यनगर पाडा ४मधील सुमारे ४००हून अधिक कुटुंबियांची पायवाट वनविभागाने रोखल्याने रहिवाशांची कुचंबणा झाली असून त्यांनी आमदार संजय केळकर यांच्याकडे धाव घेतली. यावेळी श्री.केळकर यांनी वनमंत्री आणि वन अधिकाऱ्यांशी संवाद साधल्यानंतर ही पायवाट लवकरच खुली होणार असल्याचे चर्चेत स्पष्ट झाले आहे.
भाजपच्या खोपट येथील कार्यालयात आयोजित जनसेवकाचा जनसंवाद या कार्यक्रमात लोकमान्यनगर पाडा ४ मधील रहिवाशांनी आमदार संजय केळकर यांची भेट घेऊन याबाबत निवेदन दिले होते. वनखात्याच्या जागेतून जाणाऱ्या या पायवाटेचा वापर रहिवासी गेली ६० वर्षे करत आहेत. या रस्त्यावरून आजवर रुग्णवाहिका, शाळा बस, अग्निशमन दल, मलनिस्सारण विभागाची वाहने आणि रहिवाशांची वाहने ये-जा करत होती. मात्र अचानक वन विभागाने गेट लावून हा रस्ता बंद केला. त्यामुळे शेकडो रहिवाशांना आता पायी प्रवास करावा लागत असून एखादी दुर्घटना घडल्यास महापालिकेची आपत्कालीन वाहने देखील परिसरात येऊ शकत नाहीत. शिवाय इतर वाहनांचा मार्ग बंद झाल्याने गंभीर समस्या निर्माण होण्याची शक्यता यावेळी रहिवाशांनी श्री.केळकर यांच्याकडे बोलून दाखवली.
श्री.केळकर यांनी तत्काळ वनमंत्री गणेश नाईक यांच्याकडे पत्राद्वारे रहिवाशांची व्यथा मांडून काही अटीशर्तींवर ही वाट मोकळी करण्याची विनंती केली तसेच संबंधित वन अधिकाऱ्यांशी देखील चर्चा केली. ही चर्चा सकारात्मक झाली असून लवकरच ही पायवाट खुली होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. यावेळी रहिवाशांचे नेतृत्व करणारे नगरसेवक अमित सरैय्या हे देखील उपस्थित होते.
जनसेवकाचा जनसंवाद या कार्यक्रमात आर टी आय शाळा प्रवेश, पुनर्विकास, वनविभाग, आर्थिक फसवणूक आदींबाबतही निवेदने प्राप्त झाली. यावेळी कैलास म्हात्रे, सुरज दळवी, राजेश ठाकरे आदी पदाधिकारी उपस्थित होते.