जागतिक महिला दिनानिमित्त ठाणे महापालिका आयोजित रांगोळी,
निबंध, मेहंदी स्पर्धेस कर्मचाऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
महापौर शर्मिला पिंपळोलकर यांनी केले सर्व महिलांचे कौतुक
८ मार्च या जागतिक महिला दिनानिमित्त ठाणे महानगरपालिकेच्या महिला कर्मचाऱ्यांसाठी आज ठाणे महानगरपालिका मुख्यालयात रांगोळी व मेहंदी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.. या स्पर्धेचे उद्घाटन शर्मिला पिंपळोलकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व कर्मचाऱ्यांचे कौतुक करत महिलांनी आपल्या दैनंदिन कामकाजासोबत अशा सांस्कृतिक उपक्रमांमध्ये सहभागी होऊन आपले कलागुण जोपासत आहेत याबद्दल कौतुक करुन स्पर्धकांना शुभेच्छा दिल्या. यावेळी उपायुक्त अनघा कदम, डॉ. मिताली संचेती, मुख्य पर्यावरण अधिकारी मनिषा प्रधान, कार्मिक अधिकारी दयानंद गुंडप, उपमाहिती जनसंपर्क अधिकारी प्राची डिंगणकर यांच्यासह विविध विभागांचे कर्मचारी उपस्थित होते.
महापालिकेच्या विविध विभागांतील महिला कर्मचाऱ्यांनी या स्पर्धेत उत्स्फूर्त सहभाग नोंदवत आकर्षक रांगोळ्या साकारल्या. महिला सक्षमीकरण, सामाजिक संदेश तसेच पारंपरिक कलाकृतींवर आधारित रांगोळ्यांमधून सहभागी कर्मचाऱ्यांची सर्जनशीलता आणि कल्पकता दिसून आली.
तसेच मेहंदी स्पर्धेलाही महिला कर्मचाऱ्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला. विविध सुबक आणि आकर्षक डिझाईन्सच्या माध्यमातून कर्मचाऱ्यांनी आपले मेहंदी कलेतील कौशल्य सादर केले. तसेच शाळा क्र. 44 मध्ये आयोजित केलेल्या निबंध स्पर्धेसही कर्मचाऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.