अद्वैत कचराजच्या ८८ धावांच्या खेळीसह ५ बळी आणि तन्मय महासरियाच्या ५ बळीमुळे सुलोचनादेवी सिंघानिया स्कूलने जमानाबाई नरसी स्कूलचा ७६ धावांनी पराभव करत मुंबई शालेय क्रिडा संघटना आयोजित हॅरिस शिल्ड आंतरशालेय क्रिकेट स्पर्धेतील वाटचाल कायम ठेवली. सिंघानिया स्कूलच्या १५६ धावांचा पाठलाग करणाऱ्या जमनाबाई नरसी स्कुलला ८० धावांवर गुंडाळत अद्वैत आणि तन्मयने संघाला तिसऱ्या फेरीत स्थान मिळवून दिले.
प्रथम फलंदाजी करणाऱ्या सुलोचनादेवी सिंघानिया स्कूलचे फलंदाज शौर्य खिवानीच्या माऱ्यापुढे ढेपाळले होते. पण अद्वैतची अर्धशतकी खेळी आणि तन्मयच्या २७ धावामुळे सुलोचनादेवी सिंघानिया स्कूलला दिड शतकी धावसंख्येचा पल्ला गाठता आला. शौर्यने ३२ धावांत ७ बळी मिळवत प्रतिस्पर्ध्यांना अडचणीत आणले होते. उत्तरादाखल अद्वैत आणि तन्मयने अचूक टप्प्यावर मारा करत जमनाबाई नरसी स्कुलला ८० धावांवर रोखत विजय साजरा केला. या डावात पराभूत संघाच्या युवान महाराजियाने १४ आणि हरीशांत मेहताने १३ धावा बनवल्या. प्रतिस्पर्धाना झटपट गुंडाळताना अद्वैत आणि तन्मयने प्रत्येकी पाच बळी मिळवले.
संक्षिप्त धावफलक : सुलोचनादेवी सिंघानिया स्कूल : सर्वबाद १५६ ( अद्वैत कचराज ८६, तन्मय महासरिया २७, शौर्य खिवानी ६.३- ०- ३२- ७) विजयी विरुद्ध जमनाबाई नरसी स्कुल : सर्वबाद ८०(हरिशांत मेहता १३, युवान महाराजिया १४, तन्मय महासरिया १३- ३- २८- ५, अद्वैत कचराज १३.४- २- ४२- ५). सुलोचनादेवी सिंघानिया स्कूल ७६ धावांनी विजयी.