झोपडपट्टी पुनर्वसनाच्या पार्श्वभूमीवर ठाण्यासह मुंबईच्या किनारपट्ट्यावर ऐतिहासिक ठेवा असणाऱ्या कोळीवाड्यांच्या विकासासाठी स्वतंत्र धोरण ठरवून त्याची तातडीने अंमलबजावणी करावी अशी मागणी अखिल भारतीय कोळी समाजाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष केदार लखेपुरिया यांनी एका निवेदनाद्वारे ठाण्याचे जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांच्याकडे केली आहे. केदार लखेपुरिया यांंनी आपल्या मागण्यांचे निवेदन नुकतेच जिल्हाधिकारी डॉ श्रीकृष्ण पांचाळ यांना दिले. त्यावेळी अखिल भारतीय कोळी समाजाचे ठाणे जिल्हा अध्यक्ष आनंद कोळी उपस्थित होते. यासंदर्भात लखेपुरिया म्हणाले, ठाण्यासह मुंबईत चाळीसपेक्षा जास्त कोळीवाडे अजूनही अस्तित्वात आहेत. एकीकडे ठाणे, मुंबईत विकासाची कामे वेगाने सुरू असताना या मातीत मूळ अधिष्ठान आणि सांस्कृतिक वारसा असणारा या कोळीवाड्यातील भूमिपुत्रांची उपजीविका, नोकरी, निवास आणि त्यांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. राज्य शासनाने झोपडपट्टीचे पुनर्वसन करून तिथे राहणाऱ्या लोकांना दिलासा दिला आहे. गावठाण असणाऱ्या कोळीवाड्यांच्या सीमा निश्चित करून त्यांचे सीमांकन अद्याप केलेले नाही. विकास आराखडा व त्यांचे नियोजन अजून प्रलंबित आहे. त्यामुळे आमच्या मागण्यांचा सकारात्मक विचार करण्याची मागणी केली आहे. कोळीवाड्यांसाठी स्वतंत्र विकास धोरण ठरवावे व ते तातडीने सुरू करावे. सीआरझेड अतंर्गत गावठाण सीमांकनाची प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करून त्यांचे अधिकृत नकाशे प्रकाशित करणे. भूमी महसूल कायद्यानुसार गावठाण विस्तार योजना लागू करणे. कोळीवाड्यांमध्ये असणाऱ्या घरांची दुरुस्ती, पुनर्बांधणी, एफएसआय आणि बांधकाम परवानगीसाठी स्वतंत्र परिभाषा व धोरण ठरवावे.सर्व कोळीवाड्यांना वारसा स्थळाचा (हेरिटेज वास्तू) दर्जा देण्यात यावा अशा मागण्या या निवेदनाद्वारे प्रशासनाकडे करण्यात आल्या आहेत.