
शर्टाची इस्त्री मोडू न देणारा, व्हॅनिटी व्हॅनमध्ये बसणारा, वर्क फ्रॉम होम करणारा उपमुख्यमंत्री मी नाही…
बाळासाहेब असते तर सावरकरांवर टीका सहन केल्याबद्दल मिरच्यांची धुरी दिली असती
पूरग्रस्तांच्या मुलामुलींची लग्न लावून देण्यासाठी शिवसेना पुढाकार घेणार
बाळासाहेबांचे जन्मशताब्दी वर्ष शताब्दी महोत्सव म्हणून साजरे करणार
स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महायुतीचा भगवा फडकविण्यासाठी सज्ज व्हा
महाराष्ट्रातील शेतकऱ्यांवर पूरस्थितीमुळे फार मोठे अस्मानी संकट कोसळले आहे. त्यांच्या जमिनी, शेती घरे संसार उध्वस्त झाले आहेत. पूरग्रस्त भागातील शेतकऱ्यांची दिवाळी काळी होऊ देणार नाही,अशी ग्वाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. शिवसेनेचा दसरा मेळावा गोरेगाव येथील नेस्को सेंटरमध्ये पार पडला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना परंपरेला साजेसा उत्साह दाखवला. पूरग्रस्त भागात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून जिथे आपत्ती तिथे शिवसेना, ते संकट तिथे एकनाथ शिंदे, असे सांगत मदतीचे धोरण हेच शिवसेनेचे तोरण असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. शेतकऱ्यांना शर्ती न ठेवता मदत करण्याचा मंत्रिमंडळाने निर्णय घेतल्याचे सांगून उद्या होणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि स्वतः याबाबत ठोस निर्णय घेणार असल्याचेही शिंदे यांनी जाहीर केले. मेळाव्यासाठी मुंबई-ठाण्यातील शिवसैनिकांना बोलावण्यात आले असून मराठवाडा-विदर्भातील शिवसैनिकांना आपल्या भागातील शेतकऱ्यांना मदत करण्याचे आवाहन त्यांनी केले. यंदाचा दसरा मेळावा पूरग्रस्त परिस्थितीच्या सावटाखाली असल्याचे सांगून शेतकऱ्यांनी धीर न सोडता टोकाचे पाऊल उचलू नये, असे आवाहन शिंदे यांनी केले. शर्टाची इस्त्री मोडू न देणारा, व्हॅनिटी व्हॅनमध्ये बसणारा, वर्क फ्रॉम होम आणि फेसबुक लाईव्ह करणारा मुख्यमंत्री मी नाही,” असा अप्रत्यक्ष टोला त्यांनी उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता लगावला. मदत करणारा शिवसैनिक संकटकाळात जनतेसोबत उभा राहतो, असे बाळासाहेब सांगायचे, त्याची आठवणही त्यांनी करून दिली. दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदत मिळेल, असेही त्यांनी आश्वासन दिले. आम्ही दिलेल्या मदतीचे फोटो विरोधक राजकारणासाठी वापरतात, पण तेच मुख्यमंत्री असताना आम्ही त्यांच्या फोटोसह मदत केली होती,” असा टोला त्यांनी ठाकरे यांचे नाव न घेता लगावला. मदतीच्या किटमध्ये 26 जीवनावश्यक वस्तू दिल्याचे सांगत, “तुम्ही साधा बिस्किटाचा पुडा सुद्धा दिला नाही,” अशी घणाघाती टीका त्यांनी केली. काही नेते फक्त नौटंकीसाठी पूरग्रस्त भागात जाऊन परत आल्याचे सांगून “दानत्व लागते ते एकनाथ शिंदे मध्येच आहे,” अशी टिप्पणी त्यांनी केली. “संपत्तीचा मोह आम्हाला नाही, माझे शिवसैनिकच माझे ऐश्वर्य आहे, बाळासाहेबांचे विचार हीच माझी संपत्ती आहे,” असेही शिंदे म्हणाले. अडीच वर्षात 450 कोटी रुपये देऊन 70 हजार रुग्णांना जीवनदान मिळाल्याचे त्यांनी सांगितले. ते मुख्यमंत्री असताना फक्त अडीच कोटी रुपये देण्यात आले होते, अशी तुलना करून सरकारच्या कार्यक्षमतेची आठवण करून दिली. शासन आपल्या दारी उपक्रमातून जनतेचे प्रश्न सोडवले आणि त्यामुळेच जनतेने आमच्यावर विश्वास दाखवला, असे त्यांनी सांगितले. प्रधानमंत्री मोदींनी महाराष्ट्राला 46 हजार कोटी रुपये दिल्याचे, शेतकऱ्यांचा दहा हजार कोटी रुपयांचा टॅक्स माफ केल्याचे, ऑपरेशन सिंदूरमधून पाकिस्तानला धडा शिकवला असल्याचे त्यांनी नमूद केले. केंद्र सरकारने नवी मुंबई विमानतळ, मेट्रो यांसाठी मदत दिल्याचे सांगून महाविकास आघाडी सरकार असते तर एकही प्रकल्प सुरु झाला नसता, असा घणाघात त्यांनी केला. मुख्यमंत्री झाल्यावर सणांवरील बंदी उठवल्याची आठवणही त्यांनी करून दिली. आमचा मेळावा सुरतला घ्या म्हणणाऱ्यांनी खरा दसरा मेळावा पाकिस्तानात घ्यायला हवा होता, असेही शिंदे म्हणाले. राहुल गांधींवर सडकून टीका करताना “ते पाकिस्तानी प्रेमी आहेत, सावरकरांवर जाणूनबुजून टीका करतात आणि त्यांच्यासोबत काहीजण बसतात,” असे ते म्हणाले. “बाळासाहेब असते तर उलटे टांगून मिरचीची धुरी दिली असती,” असा जळजळीत टोला त्यांनी लगावला. 2019 मध्ये काँग्रेससोबत सत्ता स्थापन करून त्यांनी हिंदुत्व सोडल्याचे सांगून “गटप्रमुख नव्हे तर कटप्रमुख” असल्याचा आरोप शिंदे यांनी केला. “बाळासाहेबांनी कमावलेले वैभव त्यांनी गमावले आहे, आता त्यांची सावलीही त्यांना साथ देणार नाही,” अशी टीकाही त्यांनी केली. मुंबई मराठी माणसाचीच राहील, ती महाराष्ट्रातच राहणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली. गिरणी कामगारांना घरे देण्याचे आश्वासन दिले, तसेच एसआरए प्रकल्प, जीडीपी व गुंतवणुकीत महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर असल्याचे त्यांनी नमूद केले. 2014 नंतर मोदी सरकारने भ्रष्टाचार्यांना जेलमध्ये टाकले, राममंदिराचे स्वप्न पूर्ण केले, आरएसएसने राष्ट्रसेवा केली, याची माहिती देत शिंदे यांनी मोदी सरकारच्या कार्याची प्रशंसा केली. लोकसभा, विधानसभा आपण जिंकल्या आहेत. आता स्वराज्य संस्थांवर महायुतीचा भगवा फडकवायचा आहे, असे सांगून त्यांनी सर्व कार्यकर्त्यांना कामाला लागण्याचे आवाहन केले. “मी फक्त एक कार्यकर्ता आहे, प्रत्येक शिवसैनिकाने एकनाथ शिंदे बनून काम करावे,” असे ते म्हणाले. टीका करताना ते रंग बदलतात, त्या वेगाने रंग बदलणारा सरडा मी पाहिला नाही, अशी जहरी टीका त्यांनी उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता केली. 2026 मध्ये बाळासाहेब ठाकरे जन्मशताब्दी वर्ष जोरदारपणे साजरे करण्याची ग्वाही दिली. यावेळी माजी आमदार राजन तेली आणि अण्णासाहेब माने यांचा पक्षप्रवेश संपन्न झाला.