
११५ वर्षे जुन्या आनंद भारती समाजाने जोपासली बांधिलकी
उच्च न्यायालयाच्या निर्देशांनंतर राज्यात पर्यावरणपूरक पूरक गणेश विसर्जनासाठी पाऊले उचलली गेली. यंदा 115 वा गणेशोत्सव साजरा करणाऱ्या श्री आनंद भारती समाजाने चार वर्षांपूर्वी काळाची पाऊले ओळखून सुरु केलेल्या पर्यावरणपूरक गणेश विसर्जनाची परंपरा यंदाही कायम ठेवत चेंदणी बंदरावर स्वतःच्या पाण्याच्या टाकीत विसर्जन करून बाप्पाला निरोप दिला.
या उपक्रमाबद्दल संस्थेचे अध्यक्ष हरेश्वर मोरेकर म्हणाले संस्थेचे संस्थापक दिवंगत दगडू पांडू नाखवा यांनी 115 वर्षांपूर्वी संस्थेचे सदस्य बेंडू मिस्त्री (ठाणेकर) यांच्या घरी गणेशोत्सव साजरा करण्यास सुरुवात केली. कालातंराने हा गणेशोत्सव संस्थेच्या स्वतःच्या वास्तूत साजरा होऊ लागला. प्रारंभीच्या दशकात कळवा खाडीत तर एक वर्ष मासुंदा तलावात गणेश विसर्जन झाले. त्यानंतर चेंदणी बंदरात विसर्जन होत होते. चार वर्षांपूर्वी संस्थेचे तत्कालीन कार्याध्यक्ष महेश कोळी यांनी केंद्र व राज्यशासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देताना स्वतःच्या टाकीत गणेश विसर्जनाची संकल्पना मांडली त्यानुसार आता विसर्जन होत असते.
संस्थेचे कार्यवाह संदीप कोळी म्हणाले, गणेश विसर्जनानंतर ती टाकी पुन्हा संस्थेच्या क्रिडांगणात आणली जाते, नंतर कालांतराने ते पवित्र जल संस्थेच्या आवारातील झाडांना वाहिले जाते, त्यामुळे बाप्पा आपल्याला सोडून गेला नाही, तो आपल्या सोबतच क्रिडांगणात असल्याची भावना संस्थेचे खेळाडू, सदस्यांमध्ये रुजली आहे. त्यामुळे भविष्यात देखील हा उपक्रम कायम राबवला जाईल याची खात्री वाटते.