
वारली आदिवासी उठावाच्या झुंजार प्रणेत्या, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या आणि अखिल भारतीय किसान सभेच्या महान नेत्या कॉम्रेड गोदावरी परुळेकर यांच्या जन्मदिनाचे निमित्त साधून तलासरीच्या कॉम्रेड गोदावरी शामराव परुळेकर महाविद्यालयात त्यांच्या अर्धाकृती पुतळ्याचे अनावरण जिल्ह्यातील ९७ वर्षे वयाचे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष व किसान सभेचे सर्वात ज्येष्ठ नेते आणि गोदूताईंचे सहकारी एल. बी. धनगर आणि पक्षाचे पॉलिट ब्युरो सदस्य व अखिल भारतीय किसान सभेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. अशोक ढवळे यांच्या हस्ते एका दिमाखदार सोहळ्यात झाले. आदिवासी प्रगती मंडळातर्फे हा कार्यक्रम होता. हा पुतळा तयार करण्याची मूळ कल्पना पक्ष व किसान सभेचे आणखी एक ज्येष्ठ नेते, माजी खासदार व माजी आमदार कॉ. लहानू कोम यांची असल्यामुळे तो एक प्रकारे त्यांच्या स्वप्नपूर्तीचा सोहळा होता. तीन महिन्यांपूर्वी २८ मे २०२५ रोजी लहानू कोम यांचे वयाच्या ८७व्या वर्षी निधन झाले. पुतळ्याच्या अनावरणानंतर झालेल्या सभेत एल. बी. धनगर, डॉ. अशोक ढवळे, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार)चे माजी आमदार सुनील भुसारा, प्राचार्य डॉ. बी. ए. राजपूत, मुंबईचे माजी शेरीफ मोहनभाई पटेल, माजी जिल्हा परिषद सदस्य काशिनाथ चौधरी, नगरसेवक सुहास सुरती, यांनी आपले मनोगत व्यक्त केले. गोदूताई व शामराव परुळेकरांचे क्रांतिकारी विचार आणि कार्याची मांडणी करून ते पुढे नेणे हीच त्यांना आदरांजली ठरेल असे त्यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आदिवासी प्रगती मंडळाचे सचिव रूपेश राणे हे होते. या सोहळ्याला ज्येष्ठ नेत्या हेमलता कोम, माकपचे केंद्रीय कमिटी सदस्य आमदार विनोद निकोले, पक्षाचे जिल्हा सचिव किरण गहला, पक्ष व जनसंघटनांचे नेते लक्ष्मण डोंबरे, रडका कलंगडा, चंद्रकांत घोरखाना, चंद्रकांत धांगडा, प्राची हातिवलेकर, लहानी दौडा, सुनीता शिंगडा, नंदकुमार हाडळ, राजेश दळवी, सुरेश भोये, भास्कर म्हसे, जिल्ह्यातील सर्व प्रमुख कार्यकर्ते, समाजसेवक अजितदादा नार्वेकर व हसूभाई ठक्कर, व मान्यवर हजर होते. राष्ट्रगीताने सांगता झाली. यावेळी वारली आदिवासींच्या विविध वस्तूंच्या कलात्मक प्रदर्शनाचे उद्घाटनही डॉ. अशोक ढवळे यांच्या हस्ते करण्यात आले.