
वेद शास्त्र, वैदिक योग, पर्यावरण, औषधी वनस्पती शास्त्र, वास्तू शस्त्राचे मिळणार प्रशिक्षण !
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उत्तर प्रदेशचे आयुषविज्ञानमंत्री दयाशंकर मिश्रा यांच्याहस्ते उद्घाटन संपन्न….
वेदांमध्ये आद्यस्थानी वसलेल्या ईश्वरास माझे वंदन आहे, अशी नम्र भक्तिभावना संत ज्ञानेश्वरांनी ‘ओम् नमो जी आद्या, वेद प्रतिपाद्या’ अशा शब्दांत व्यक्त केली होती. येथे उपस्थित राहिल्यामुळे देशाच्या त्या प्राचीन ज्ञानपरंपरेशी जोडला गेल्याची पवित्र भावना माझ्या मनात निर्माण झाली असल्याचे मत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले. श्री धर्मसंघ मणी मंदिर दुर्गाकुंड येथे उभारण्यात आलेल्या शास्त्र संग्रहालय आणि अनुसंधान केंद्राच्या उद्घाटन समारंभात ते बोलत होते. पुरी जगन्नाथ येथील रथयात्रेला सुरुवात होत असतानाच या केंद्राचे उद्घाटन होत असल्याने एक अनुपम योग जुळून आला असल्याचे मत शिंदे यांनी व्यक्त केले. यावेळी उत्तर प्रदेशचे आयुषविज्ञान मंत्री दयाशंकर मिश्रा, शास्त्र संग्रहालयाचे संचालक रामानंद तिवारी, पद्मश्री आचार्य गणेश्वर शास्त्रीजी, उपेंद्र त्रिपाठी, धर्म संसदेचे महामंत्री आचार्य जगजित पांडे, भजन बोबडे उपस्थित होते. यावेळी बोलताना, स्वामी करपात्री जी महाराज यांचा हा मणी मंदिर आश्रम म्हणजे, सनातन हिंदू धर्माचे एक केंद्र आहे. इथे आध्यात्म, संस्कृती आणि सामाजिक एकतेचा संगम अनुभवता येतो. आचार्य गणेश्वर शास्त्रीजी यांनी अयोध्येतील रामलल्ला प्राण प्रतिष्ठेचा आणि काशी विश्वनाथ मंदिरातील प्राणप्रतिष्ठेचा शुभमुहूर्त काढला होता. आज या मंदिरात त्यांच्या प्रमुख उपस्थितीत हा आगळा वेगळा कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल आयोजकांचे आभार मानले. तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने यासाठी पुढाकार घेतल्याबद्दल त्यांचेही आभार व्यक्त केले. दुर्गाकुंड येथील हे संग्रहालय केवळ संग्रहालय नसून आपली समृद्ध परंपरा नवीन पिढीपर्यंत पोहोचवण्याचा प्रामाणिक प्रयत्न आहे असे मत व्यक्त केले. या केंद्रामध्ये वैदिक योग, पर्यावरण, औषधी वनस्पती यावरील कोर्सेस सुरू होतील, वैदिक वास्तुशास्त्र, विज्ञानाशी संबंधित अनेक कोर्सेस इथे सुरू होतील. तसेच वैदिक ज्ञानाचे महत्त्व पटवून देणारे थ्रीडी संग्रहालय देखील इथे उभे राहिल. पंतप्रधान नरेंद्र मोदी कायमच प्राचीन वेदांचे आपल्या भाषणातून दाखले देतात त्यामुळे जगभरात त्याबद्दल कुतूहल निर्माण झाले आहे. जगभरातून वेद आणि शास्त्रोक्त विद्या शिकण्यासाठी येणाऱ्या लोकांसाठी आगामी काळात हे एक हक्काचे केंद्र ठरेल अशी अपेक्षा व्यक्त केली. यावेळी आचार्य गणेश्वर शास्त्रीजी आणि शास्त्र संग्रहालयाचे संचालक रामानंद तिवारी यांच्याकडून या केंद्राची माहिती जाणून घेतली. तसेच या केंद्रात ठेवण्यात आलेली जुनी पुस्तके आणि ग्रंथसंपदा यांचीही यावेळी माहिती घेतली. तसेच या ठिकाणी डिजिटल स्वरूपात जतन केलेल्या साहित्याची देखील मान्यवरांच्या साथीने पाहणी केली.