
आपल्या आजोळी पायी जाणाऱ्या एका मुलाला काही व्यसनाधीन व्यक्तींनी पुलावरून खाली फेकले. गंभीर रित्या जखमी झालेल्या मुलाच्या दोन्ही पायाच्या घोट्यांची हाड तुटली होती असताना उपचारासाठी सिव्हिल रुग्णालयात आणल्यावर घोट्यांची जोखमीची यशस्वी शस्त्रक्रिया पार पडली आहे. खर्डी रेल्वे स्टेशन जवळच्या गावात राहणारा कृष्णा मुकणे (१५) आपल्या आजीकडे चालत संध्याकाळच्या सुमारास जात होता. समृद्धी महामार्ग येथील पुलावरून जाते वेळी नशेत असलेल्या काही अज्ञात व्यक्तींनी कोणते ही कारण नसताना कृष्णाला उचलले आणि पुलावरून खाली फेकले. मात्र खाली पडून कृष्णा जबर जखमी झाला होता. त्याला उठता ही येत नव्हते. जवळच काही कामगार काम करत होते त्यांनी कृष्णाची माहिती घेऊन कुटुंबियाना कळवले. दोन्ही पायांच्या घोटाला मार बसल्यामुळे त्याला तत्काळ ठाणे सिव्हिल रुग्णालयात दाखल केलं. कृष्णाच्या दोन्ही पायांचे एक्सरे काढल्यावर घोट्यांची हाड मोडली असल्याचे समजले. सिव्हिल रुग्णालयात गेल्या काही वर्षात गुंतागुंतीच्या जोखमीच्या शस्त्रक्रिया यशस्वी होत आहेत. मात्र कृष्णाची काहीशी आव्हानात्मक शस्त्रक्रिया होती.
जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. कैलास पवार अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. धीरज महांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली शस्त्रक्रिया करण्यात आली.पंधरा दिवसांत कृष्णाच्या दोन्ही घोट्यांच्या एकूण तीन शस्त्रक्रिया यशस्वी झाल्या आहेत. एका पायाला जखम असल्याने एक शस्त्रक्रिया विलंबाने करावी लागली होती. या शस्त्रक्रियेसाठी अस्थि तज्ज्ञ डॉ. विलास साळवे, डॉ. अजित भुसागरे, डॉ. मयूर नागरगोजे, डॉ. दिपेश पाटील,भूल तज्ज्ञ डॉ. रुपाली यादव यांचे सहकार्य लाभले. कृष्णाच्या शस्त्रक्रियेसाठी खाजगी रुग्णालयात मोठा खर्च आला असता. परतू सिव्हिल रुग्णालयातील डॉक्टर आणि कर्मचारी वर्ग रुग्णांसाठी नेहमीच देवदूत होऊन काम करत आहेत. शस्त्रक्रियेसाठी रुग्णालयात अत्याधुनिक उपकरणे ठेवण्यात आली आहेत. त्यामुळे खाजगी रुग्णालयात होणाऱ्या जोखमीच्या शस्त्रक्रिया ही सिव्हील रुग्णालयात होतात.