
कोकणात शिवसेनेची ताकद वाढली; निलेश सांबरे यांचा पक्षप्रवेश जनतेच्या विश्वासाचा नवा अध्याय..
सामाजिक चळवळीचे सशक्त नेतृत्व करणारे, जनतेच्या प्रश्नांसाठी झगडणारे आणि कोकणासह संपूर्ण महाराष्ट्रात हजारो लोकांचे आयुष्य बदलणारे मा. निलेशजी सांबरे यांनी आज शिवसेना पक्षात अधिकृतरित्या प्रवेश केला. ठाणे येथील किआरा बँक्वेट हॉलमध्ये पार पडलेल्या या ऐतिहासिक सोहळ्यात मा. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, उद्योगमंत्री मा. उदय सामंत, खासदार मा.नरेश म्हस्के व सचिव शिवसेना मा.राम रेपाळे इतर अनेक मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत हा पक्षप्रवेश मोठ्या उत्साहात संपन्न झाला. निलेशजी सांबरे हे नाव गेली दोन दशके कोकणातील पाचही जिल्ह्यात जनतेसाठी आधार बनले आहे. त्यांचं कार्य केवळ सामाजिक उपक्रमापुरतं मर्यादित न राहता, ते एक व्यापक चळवळ बनले आहे. ‘जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था’ व ‘जिजाऊ संघटनेच्या माध्यमातून त्यांनी आरोग्य, शिक्षण,, महिला सक्षमीकरण, रोजगार आणि ग्रामीण विकास या सर्वच क्षेत्रांत मूलभूत पातळीवर काम केलं आहे. आज त्यांच्या प्रयत्नातून तीन मोफत मल्टीस्पेशालिटी रुग्णालय, दहा इंग्रजी माध्यमाच्या मोफत शाळा, पंचवीस मोफत रुग्णवाहिका सेवा, अठ्ठावीस मोफत आरोग्य केंद्रं आणि दोन हजारांहून अधिक गावे गाठणाऱ्या शाखा कार्यरत आहेत. या माध्यमातून त्यांनी लाखो लोकांपर्यंत सेवा पोहोचवली आहे. हे सर्व कार्य केवळ सेवाभावातून घडले आहे. कोणतीही सत्ता, पद किंवा राजकीय मदत न घेता समाजात परिवर्तन घडवणं, हीच त्यांची खरी ओळख आहे. मात्र आज त्यांनी घेतलेला शिवसेना प्रवेश हा एका नव्या टप्प्याची सुरुवात आहे.शिवसेना पक्ष हा केवळ एक राजकीय संघटना नसून मराठी माणसाच्या आत्मसन्मानासाठी आणि दुर्गम भागातील जनतेच्या हक्कांसाठी लढणारी चळवळ आहे. हाच विचार आणि मूल्यं जपण्यासाठी निलेशजी सांबरे यांनी शिवसेना पक्षाचा स्वीकार केला आहे. या प्रसंगी बोलताना निलेशजी सांबरे म्हणाले की, मी राजकारणात प्रसिद्धीसाठी किंवा सत्तेसाठी आलो नाही. माझ्या सामाजिक व शैक्षणिक कामाला आता निर्णयप्रक्रियेतून अधिक बळ मिळावं, हाच उद्देश आहे.
आजवर मी जनतेच्या दारापर्यंत पोहोचलो, आता त्यांचे प्रश्न शासनाच्या दारात नेऊन मांडण्यासाठी हा टप्पा गाठतो आहे. शिवसेना पक्ष म्हणजे जनतेचा पक्ष आहे, आणि मी फक्त जनतेसाठीच राजकारणात आलो आहे. कार्यक्रमात उपस्थित असलेले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या प्रवेशाचे मन:पूर्वक स्वागत करताना नमूद केलं की, “निलेश सांबरे यांचं कार्य मी अनेक वर्षांपासून पाहत आहे. निलेश जिजाऊचा ढाण्या वाघ आहे. ते ज्या पातळीवर समाजात कार्यरत आहेत, त्यांना समाजकार्यातील हिरा म्हंटल तर ते चुकीच ठरणार नाही . अशा नेतृत्वाचा पक्षात प्रवेश होणं, ही संपूर्ण शिवसेनेसाठी अभिमानाची बाब आहे. हा केवळ एक प्रवेश नाही, तर समाजकारणाला राजकीय दिशा देणारा ऐतिहासिक क्षण आहे. या प्रवेशामुळे कोकणासह संपूर्ण महाराष्ट्रात शिवसेनेला एक नवा उर्जास्रोत लाभला आहे. निलेशजींचे व्यक्तिमत्त्व, त्यांचं काम, आणि त्यांच्याबद्दल असलेला विश्वास, हे सर्व भविष्यातील राजकारणात परिवर्तन घडवणारे ठरेल. हा पक्षप्रवेश म्हणजे सत्तेचा हव्यास नव्हे, तर सामाजिक सेवेच्या व्याप्तीला मिळालेली राजकीय दिशा आहे. आज ज्यांच्यावर लाखो लोकांनी विश्वास ठेवला आहे, तेच नेतृत्व आता तुमचं प्रतिनिधित्व विधानभवनात, लोकसभेत करणार आहे. जनतेसाठी लढणारा एक कार्यकर्ता, आता तुमच्या हक्कांसाठी निर्णय केंद्रात आवाज उठवणार आहे.
या प्रसंगी उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उद्योगमंत्री मा. उदय सामंत, खासदार मा. नरेश म्हस्के, शिवसेना सचिव मा. राम रेपाळे, तसेच जिजाऊ संघटनेचे कोकण विभागातील अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.