
ठाणे, दि. २५ सप्टेंबर : ओवळा-माजिवडा विधानसभा मतदारसंघातील शास्त्रीनगर येथील उन्नती गार्डन (धर्मवीर आनंद दिघे मैदान) येथे उभारण्यात येणाऱ्या भव्य खुल्या रंगमंचाच्या कामाचा भूमिपूजन सोहळा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते उत्साहात पार पडला.
ओवळा-माजिवडा मतदारसंघातील नागरिकांसाठी आवश्यक असलेल्या पायाभूत सुविधा आणि सार्वजनिक सुविधांना प्राधान्य देत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नातून हा खुला रंगमंच साकारण्यात येत आहे. परिसरातील नागरिकांची मागणी लक्षात घेऊन सांस्कृतिक, सामाजिक तसेच विविध सार्वजनिक कार्यक्रमांसाठी सुसज्ज व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने हा महत्त्वपूर्ण प्रकल्प आहे.
या खुल्या रंगमंचाची लांबी १५ मीटर, रुंदी १० मीटर आणि उंची ६ मीटर असणार आहे. रंगमंचाच्या आत ग्रीन रूम तसेच चेंजिंग रूमची सुविधा असणार आहे. रंगमंचाच्या दोन्ही बाजूंना पुरुष आणि महिलांसाठी स्वतंत्र प्रसाधनगृह, कार्यालय आणि स्टोअर रूम बांधण्यात येणार आहेत. त्याचबरोबर मैदानाचे सपाटीकरण, मैदानाभोवती संरक्षक भिंत, आकर्षक प्रवेशद्वार आदी कामेही करण्यात येणार आहेत.
शास्त्रीनगर येथील हा खुला रंगमंच परिसरातील नागरिकांसाठी महत्त्वाची सुविधा ठरणार आहे. सामाजिक, सांस्कृतिक आणि सार्वजनिक कार्यक्रमांसाठी नागरिकांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध होणार आहे. नागरिकांच्या मागणीनुसार आवश्यक सुविधा निर्माण करून ओवळा-माजिवडा मतदारसंघाचा विकास करण्यासाठी यापुढेही प्रयत्न सुरू राहतील, असे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितले.
ओवळा-माजिवडा मतदारसंघातील नागरिकांच्या गरजा आणि अपेक्षा लक्षात घेऊन विविध विकासकामांना सातत्याने गती देण्यात येत आहे. शास्त्रीनगर येथील या खुल्या रंगमंचामुळे परिसरातील नागरिकांना सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रमांसाठी हक्काचे व्यासपीठ उपलब्ध होणार आहे.यावेळी नगरसेविका सौ. परिषाताई सरनाईक, सौ. जयश्री डेविड, सौ. विमल भोईर, श्री. वैभव कदम, श्रीमती सुलेखा चव्हाण, श्री. राकेश शिंदे, सौ. शितल ढमाले तसेच विभागप्रमुख श्री. भगवान देवकते, श्री. रामचंद्र गुरव, श्री. संतोष ढमाले आणि समस्त पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.