महापौर शर्मिला पिंपळोलकर यांच्या हस्ते १५ शिक्षकांचा आदर्श शिक्षक महापौर पुरस्काराने सन्मान

ठाणे, (09) : ठाणे महानगरपालिकेच्या वतीने शिक्षक दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात महापौर शर्मिला पिंपळोलकर यांच्या हस्ते ठाणे महापालिका क्षेत्रातील १५ शिक्षकांना ‘आदर्श शिक्षक महापौर पुरस्कार’ देऊन गौरविण्यात आले. राम गणेश गडकरी रंगायतन येथे झालेल्या या कार्यक्रमात शिक्षकांच्या शैक्षणिक कार्याचा गौरव करण्यात आला.
महापौर शर्मिला पिंपळोलकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमास सभागृह नेते हणमंत जगदाळे, प्रमुख पाहुणे ज्येष्ठ साहित्यिक प्रा. अशोक बागवे, अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, उपायुक्त डॉ. मिताली संचेती, उपायुक्त जी. जी. गोदेपुरे, शिक्षणाधिकारी ओंकार बजागे, लेखाधिकारी चांगदेव, गटाधिकारी संगीता बामणे आदी उपस्थित होते.
महापालिका क्षेत्रातील परवीन सय्यद, लता देवकर, किरण इंगोले, विनीता राणे, प्रांजली निजाई, सुनीता महाजन, विद्या जाधव, विनिता भंगाळे, अख्तार अहमद, मोहम्मद शेख आणि सोहेल खलील, तसेच खाजगी अनुदानित शाळांमधील दत्तात्रय बिन्नर, माधुरी अलई, कल्पना सपकाळे आणि शोभा मोरे यांना आदर्श शिक्षक महापौर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
याशिवाय ठाणे महापालिका शिक्षण विभागाची धुरा सांभाळणाऱ्या गटाधिकारी संगीता बामणे, गटप्रमुख विश्वास कोल्हे आणि विज्ञान शिक्षक रमेश बोरोले यांना विशेष पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. तसेच गटप्रमुख निलीमा पाटील आणि केंद्रप्रमुख आशा पाटे यांचाही यावेळी सन्मान करण्यात आला.
यावेळी बोलताना महापौर शर्मिला पिंपळोलकर म्हणाल्या की, “शिक्षक हा केवळ वर्गात धडा शिकवणारा नसतो, तर तो विद्यार्थ्यांना विचार करायला, स्वप्ने पाहायला आणि अपयशातून पुन्हा उभे राहायला शिकवतो. आज ज्या शिक्षकांना पुरस्कार मिळत आहे, त्यांनी आपल्या कार्यातून हे सिद्ध केले आहे. हा पुरस्कार केवळ सन्मानचिन्ह नसून त्यांच्या अनेक वर्षांच्या प्रामाणिक परिश्रमांना, त्यागाला आणि विद्यार्थ्यांप्रती असलेल्या निष्ठेला मिळालेली पावती आहे.”
अतिरिक्त आयुक्त 2 प्रशांत रोडे यांनी शिक्षकांनी विद्यार्थ्यांची आवड, क्षमता आणि कल ओळखून त्यांच्या व्यक्तिमत्त्वाच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन केले. महापालिकेच्या शाळांमध्ये सीबीएसई आणि इंग्रजी माध्यमाच्या शाळा सुरू होत असल्या, तरी प्राथमिक शिक्षण मातृभाषेत झाल्यास विद्यार्थ्यांचा शैक्षणिक पाया अधिक भक्कम होतो, असे त्यांनी नमूद केले.
उपायुक्त डॉ. मिताली संचेती यांनी प्रास्ताविकात ठाणे महापालिकेच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांसाठी विविध शैक्षणिक, वैज्ञानिक, सांस्कृतिक आणि क्रीडा उपक्रम राबविले जात असल्याची माहिती दिली. विज्ञानविषयक उपक्रम, इस्रो भेट, शिष्यवृत्ती परीक्षा, सांस्कृतिक महोत्सव, क्रीडा स्पर्धा आदी उपक्रमांमधून विद्यार्थ्यांना विविध संधी उपलब्ध करून दिल्या जात असल्याचे त्यांनी सांगितले. यंदा महापालिका शाळांमधील १४ विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेच्या गुणवत्ता यादीत आले असून, ठाणे महापालिकेचा शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल ८६ टक्के लागल्याचेही त्यांनी नमूद केले.
शिक्षकांनी विद्यार्थ्यांना नव्या विचारांची दिशा द्यावी
प्रा. अशोक बागवे यांनी शिक्षकांच्या भूमिकेवर प्रकाश टाकताना सांगितले की, विद्यार्थ्यांची भाषा, जीवन आणि परिस्थिती समजून घेऊन त्यांना योग्य आकार देणे हे शिक्षकांचे महत्त्वाचे कार्य आहे. अभ्यासात मागे असलेल्या विद्यार्थ्यांना पुढे आणण्याची जबाबदारी शिक्षकांची असून, विद्यार्थ्यांना नेहमीपेक्षा वेगळ्या आणि नव्या विचारांच्या कथा सांगून त्यांच्या मनात ‘का?’ आणि ‘कसे?’ हे प्रश्न निर्माण केले पाहिजेत.
शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यातील प्रत्यक्ष संवादाला विशेष महत्त्व आहे. केवळ ऑनलाइन शिक्षणातून अपेक्षित परिणाम साधता येत नाही, असेही प्रा. बागवे यांनी स्पष्ट केले. विद्यार्थ्यांना शिकविताना शिक्षकही सातत्याने शिकत असतो, त्यामुळे शिक्षकांनी स्वतःचे ज्ञान अद्ययावत ठेवून विद्यार्थ्यांना नव्या विचारांची दिशा द्यावी, असे आवाहन त्यांनी केले.