Skip to content
August 14, 2026
  • Facebook
  • YouTube
  • Instagram
  • Tweeter
  • Whats App.

S9 TV NEWS

` S9 News
Primary Menu
  • HOME
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • देश-विदेश
  • क्रीडा
Live
  • Home
  • ताज्या बातम्या
  • 900 खाटांचे जिल्हा सामान्य रुग्णालय लवकरच नागरिकांच्या सेवेत दाखल होणार

900 खाटांचे जिल्हा सामान्य रुग्णालय लवकरच नागरिकांच्या सेवेत दाखल होणार

S9 TV NEWS August 14, 2026
Like, Follow, Subscribe

खासदार नरेश म्हस्के, महापौर शर्मिला पिंपळोलकर यांनी अधिकाऱ्यांसमवेत रुग्णालयाची पाहणी

ठाण्यातील सर्वसामान्य, गरीब व गरजू रुग्णांसाठी मोठा दिलासा ठरणारे विठ्ठल सायन्ना रुग्णालय (जिल्हा सामान्य रुग्णालय) डिसेंबरअखेर नागरिकांच्या सेवेत दाखल होणार आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचनेनुसार खासदार नरेश म्हस्के यांनी महापौर शर्मिला पिंपळोलकर, पदाधिकारी, बांधकाम विभाग व महापालिकेच्या अधिकाऱ्यांसमवेत रुग्णालयाची आज पाहणी केली. 900 खाटांची क्षमता, एअर ॲम्ब्युलन्सची सुविधा, अत्याधुनिक वैद्यकीय उपकरणे आणि सर्व प्रकारच्या उपचार सुविधांनी सज्ज असलेले हे रुग्णालय ठाणेकरांसह संपूर्ण परिसरातील नागरिकांसाठी आरोग्यसेवेचे नवे केंद्र ठरणार असल्याची माहिती खासदार नरेश म्हस्के यांनी दिली.

        यावेळी पाहणी सभागृह नेते हणमंत जगदाळे, शिवसेना गटनेते तथा स्थानिक नगरसेवक पवन कदम, सुधीर कोकाटे, माजी नगरसेविका पूजा वाघ, महापालिकेचे कार्यकारी अभियंता मोहन कलाल, ऋषिकेश जवळकर, आरोग्य विभागाच्या डॉ. योगिता धायगुडे, माता-बालसंगोपन अधिकारी डॉ. वर्षा ससाणे तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी उपस्थित होते. अधिकाऱ्यांकडून सुरू असलेल्या कामांचा आढावा घेताना रुग्णालयातील विविध विभाग, उपचार कक्ष, आपत्कालीन सेवा, अतिदक्षता विभाग, ऑपरेशन थिएटर आणि इतर आवश्यक सुविधांची माहिती घेण्यात आली.

        ठाण्यातील जिल्हा सामान्य रुग्णालयात ठाणे जिल्ह्यासह रायगड, रत्नागिरी, पालघर, वसई आणि ग्रामीण व आदिवासी भागातील हजारो रुग्ण उपचारासाठी येत असतात. मात्र, वाढती रुग्णसंख्या आणि मर्यादित सुविधा यामुळे अनेकांना अपेक्षित उपचार मिळण्यात अडचणी येत होत्या. ही परिस्थिती लक्षात घेऊन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढाकारातून आणि सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे नव्या अत्याधुनिक रुग्णालयाची उभारणी करण्यात आली आहे.

        या रुग्णालयात 900 खाटांची सुविधा, एअर ॲम्ब्युलन्स, आधुनिक निदान यंत्रणा, अत्याधुनिक ऑपरेशन थिएटर, आयसीयू, विविध सुपर स्पेशालिटी विभाग, कर्करोगावर उपचार तसेच सर्व प्रकारच्या वैद्यकीय उपचारांची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे गंभीर रुग्णांवर तातडीने उपचार करणे शक्य होणार असून नागरिकांना मुंबईकडे धाव घेण्याची गरजही मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे. गरीब आणि गरजू रुग्णांना एकाच छताखाली दर्जेदार आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्याचा या प्रकल्पाचा उद्देश असल्याचे म्हस्के यांनी स्पष्ट केले.

        दहा मजली हे अत्याधुनिक रुग्णालय रुग्णांना सर्व प्रकारच्या वैद्यकीय सुविधा एकाच छताखाली उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने उभारण्यात आले आहे. रुग्णालयाच्या इमारतीवर एअर ॲम्ब्युलन्सची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली असून, गंभीर अवस्थेतील रुग्णांना तातडीने रुग्णालयात दाखल करणे किंवा आवश्यकतेनुसार दुसऱ्या उच्चस्तरीय वैद्यकीय केंद्रात हलविणे शक्य होणार आहे. त्यामुळे आपत्कालीन परिस्थितीत उपचारासाठी लागणारा वेळ कमी होऊन रुग्णांना तत्काळ आणि प्रभावी वैद्यकीय सेवा मिळण्यास मदत होणार आहे.

        रुग्णालयाशेजारी नर्सिंग महाविद्यालयाचे कामही वेगाने सुरू आहे. या महाविद्यालयामुळे प्रशिक्षित परिचारिका आणि आरोग्य कर्मचारी उपलब्ध होणार असून भविष्यात आरोग्य व्यवस्थेला सक्षम मनुष्यबळ उपलब्ध होईल. त्यामुळे आरोग्यसेवेची गुणवत्ता आणखी उंचावण्यास मदत होणार आहे.

        याशिवाय, कळवा येथील मेडिकल हॉस्पिटलमध्ये सध्या 200 सुपर स्पेशालिटी बेड, मुलांसाठी 200 बेड आणि सर्वसाधारण उपचारांसाठी 500 बेड उपलब्ध आहेत. नव्या जिल्हा सामान्य रुग्णालयासह या सुविधा कार्यान्वित झाल्यानंतर ठाणे शहर आणि जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्थेवरील वाढता ताण मोठ्या प्रमाणात कमी होईल. तसेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांनाही अत्याधुनिक आणि दर्जेदार उपचार सहज उपलब्ध होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

        डिसेंबरअखेर हे रुग्णालय नागरिकांच्या सेवेत दाखल करण्याचे नियोजन असून काम अंतिम टप्प्यात आले आहे. उर्वरित कामे दर्जेदार आणि वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. हे रुग्णालय सुरू झाल्यानंतर ठाणेकरांसह इतर जिल्हयातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार असून हे रुग्णालय आरोग्यसेवेच्या क्षेत्रात हा एक महत्त्वाचा टप्पा ठरणार असल्याचे खासदार नरेश म्हस्के यांनी नमूद केले.

Continue Reading

Previous: ‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत ‘तिरंगा राखी’ कार्यशाळा
  • FwZLKEnacAA0XiF
  • img-20250602-wa00015808276882074419283.jpg
  • 473241588_9184857851597815_2764842180287072871_n
  • Facebook
  • YouTube
  • Instagram
  • Tweeter
  • Whats App.
"Copyright © 2025 | S9 TV News | MoreNews by AF themes.
Share

Facebook

X

LinkedIn

WhatsApp

Copy Link
×