
स्वित्झर्लंडमधील झुरिच लेक येथे झालेल्या ३८व्या श्री चिन्मय स्विम मॅरेथॉन स्पर्धेत ठाण्याच्या तीन युवा जलतरणपटूंनी भारताला प्रथमच रौप्यपदक मिळवून देत इतिहास घडविला. या यशाबद्दल कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार ॲड. निरंजन डावखरे यांच्या हस्ते जलतरणपटू आणि प्रशिक्षकांचा सत्कार करण्यात आला.
ठाणे महानगरपालिकेच्या कै. मारोतराव शिंदे जलतरण तलावात सराव करणाऱ्या आणि ठाणे जिल्हा हौशी जलतरण संघटनेशी संलग्न स्टारफिश स्पोर्ट्स फाउंडेशनच्या कु. आयुषी कैलास आखाडे, कु. समीप्ता गणेश वाव्हळ आणि कु. सुयश प्रियांका हिंदळेकर यांनी २६ किलोमीटरच्या वेटसूट सांघिक प्रकारात अवघ्या ८ तास ७ मिनिटांत अंतर पूर्ण करत भारतीय संघाला ऐतिहासिक रौप्यपदक मिळवून दिले.
रॅपर्सव्हिल ते झुरिख या खुल्या पाण्यातील स्पर्धेत मुसळधार पाऊस, जोरदार वारे आणि १२ ते १३ अंश सेल्सिअस तापमानाच्या थंड पाण्याचा सामना करत या खेळाडूंनी उल्लेखनीय कामगिरी केली. दहा आंतरराष्ट्रीय संघांमध्ये भारतीय संघ हा वयाने सर्वात लहान संघ होता.
सत्कारप्रसंगी आमदार डावखरे यांनी युवा जलतरणपटूंना श्री विठ्ठल-रुक्मिणींची मूर्ती भेट देत शुभेच्छा दिल्या. या खेळाडूंनी भारताचा तिरंगा आंतरराष्ट्रीय स्तरावर अभिमानाने फडकावला असून भविष्यातही ते देशाचे नाव उज्ज्वल करतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. प्रशिक्षक कैलास आखाडे यांच्या मार्गदर्शनाचेही त्यांनी विशेष कौतुक केले.
यावेळी ठाणे जिल्हा हौशी जलतरण संघटनेचे उपाध्यक्ष राजेश मोरे, धनंजय कुलकर्णी, रवी काळे, वैभव देशमुख, संतोष मोरे यांच्यासह जलतरणप्रेमी उपस्थित होते.