
विधान परिषद आमदार ॲड.निरंजन वसंत डावखरे यांनी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांना निवेदनाद्वारे विनंती केली आहे की, “अनंत चतुर्थी” निमित्त कोकण विभागातील सर्व महाविद्यालयांना एकदिवसीय सुट्टी जाहीर करण्यात यावी. आपल्या पत्रात आमदार डावखरे यांनी नमूद केले आहे की, कोकणात “अनंत चतुर्थी” हा सण अत्यंत श्रद्धा व उत्साहाने साजरा केला जातो. गणेशोत्सव काळात विसर्जनाच्या दिवशी संपूर्ण कोकणात सार्वजनिक वाहतूक, गर्दी आणि स्थानिक पोलीस यंत्रणेवर मोठा ताण निर्माण होतो. तसेच, अनेक विद्यार्थी व प्राध्यापक हे आपल्या गावी गेलेले असल्याने या दिवशी महाविद्यालयांमध्ये उपस्थिती ठेवणे शक्य होत नाही. त्या अनुषंगाने, कोकण विभागातील ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग इत्यादी जिल्ह्यांतील सर्व महाविद्यालयांना “अनंत चतुर्थी” निमित्त एकदिवसीय सुट्टी जाहीर करण्यात यावी, अशी मागणी आमदार डावखरे यांनी केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी गणेशोत्सवाला ‘राज्य महोत्सव’चा दर्जा दिला. त्या पार्श्वभूमीवर, जर ही सुट्टी जाहीर करण्यात आली तर विद्यार्थ्यांना लाडक्या बाप्पाच्या विसर्जन सोहळ्यात उत्साहाने सहभागी होण्याची संधी मिळेल आणि बाप्पाला मनोभावे निरोप देता येईल,” असे आमदार डावखरे यांनी आपल्या निवेदनात नमूद केले.