
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुतीचाच विजय होईल
शिवसेनेचे मुख्य नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा विश्वास
अडीच वर्षात महायुती सरकारमध्ये मुख्यमंत्री म्हणून केलेलं काम, लोकाभिमुख योजनांमुळे भरघोस बहुमताने राज्यात महायुतीचे सरकार आले. विधानसभा निवडणुकीप्रमाणेच आगामी महापालिका, नगर परिषदा, जिल्हापरिषदा, नगर पंचायती या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुतीचाच विजय होईल, असा विश्वास शिवसेनेचे मुख्य नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. बीड, छत्रपती संभाजी नगर, सोलापूर, नाशिक आणि जालना या पाच जिल्ह्यातील विविध पक्षांचे जिल्हास्तरीय, तालुकास्तरीय पदाधिकारी आणि शेकडो कार्यकर्त्यांनी आज मुंबईत शिवसेनेचे मुख्य नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. यावेळी ते बोलत होते. यावेळी आमदार प्रदीप जैस्वाल, शिवसेना सचिव राम रेपाळे, शिवसेना धर्मवीर आध्यात्मिक सेनेचे अक्षय महाराज भोसले आदी उपस्थित होते. बीड जिल्ह्यातील उबाठा गटाचे माजी नगराध्यक्ष अनंत चिंचाळकर, वशिष्ठ सातपुते, रामदास ढगे, संदीप माने, शिवाजी सावंत यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि शाखाप्रमुखांनी शिवसेनेचे धनुष्यबाण हाती घेतला. तसेच छत्रपती संभाजी नगरमधील डॉ. जे. के जाधव, बाबा उगले, डॉ. परमेश्वर गुट्टे, मंगेश जाधव यांनी शिवसेनेत प्रवेश केला. पंढरपूरमधील राम भिंगारे, श्रीनिवास उपळकर, औदुंबर गंगेकर, प्रशांत कोकरे तसेच नाशिक जिल्ह्यातील येवला येथील रामकृष्ण खोकले, सुनिता जाधव, गणेश कदम, कल्पना ठोंबरे या सरपंचांसह पाच उपसरपंचांनी आज शिवसेनेत प्रवेश केला. जालना जिल्ह्यातील सरपंच योगिता मुळे आणि उपसरपंच शेख मुकर्रम शेख नुर यांनी उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला.