
खासदार म्हणून निवडून आल्यानंतर १ वर्षाच्या आतच नरेश म्हस्के यांनी रेल्वे विषयक अनेक प्रश्न मार्गी लावले आहेत. गेल्या ४ वर्षांपासून गणेशोत्सवासाठी कोकणात रेल्वेने जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी ठाणे रेल्वे स्थानकात तिकीटासाठी दोन अतिरिक्त आरक्षण खिडक्या सुरु कराव्यात ही प्रवासी संघटनेची मागणी प्रलंबित होती. खासदार नरेश म्हस्के यांनी पाठपुरावा केल्याने आजपासून या दोन अतिरिक्त आरक्षण खिडक्या सुरु झाल्या असून त्यांच्या हस्ते उद्घाटन संपन्न झाले. गणेशोत्सव सुरु व होण्याच्या तीन महिने आधीपासूनच मुंबई, ठाणे आणि उपनगरात स्थायिक झालेल्या चाकरमान्यांना कोकणात जाण्याचे वेध लागतात. कोकणात जाण्यासाठी रेल्वे प्रवास हा सुखकर असल्याने लाखो गणेशभक्त कोकण रेल्वेचा पर्याय निवडतात. मात्र अपुऱ्या आरक्षण खिडक्यांमुळे गणेशभक्तांची वेळ वाया जाते आणि रांगेत उभे राहून दमछाक होत होती. ही गैरसोय दूर व्हावी यासाठी प्रवासी संघटनने ठाणे रेल्वे स्थानकात कोकण रेल्वेच्या तिकीटासाठी दोन अतिरिक्त आरक्षण सुरु करण्याची मागणी केली होती. खासदार नरेश म्हस्के यांना प्रवाशांच्या प्रश्नांची जाणीव असल्याने अवघ्या काही दिवसातच ही मागणी त्यांनी मध्य रेल्वेकडून मान्य करुन घेतली. २० जून २०२५ ते ५ जुलै २०२५ या दरम्यान ठाणे रेल्वे स्थानका जवळील मुख्य पोस्ट ऑफिस इमारती समोरील मुख्य आरक्षण केंद्र येथे या दोन अतिरिक्त आरक्षण खिडक्या (खिडकी क्रमांक ७ आणि ८) सुरु राहणार आहेत. २० जून रोजी खासदार नरेश म्हस्के यांनी या दोन खिडक्यांचे उद्घाटन केले.